Sanjay Raut on Nana Patole: नाना पटोले राज्यातील महत्त्वाची व्यक्ती, त्यांनी या विषयाला फार गांभीर्याने घेऊ नये
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 11:26 AM2021-07-13T11:26:22+5:302021-07-13T11:31:32+5:30
sanjay raut's reaction on nana patole's statement: 'प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीचा सुरक्षेचा अहवाल सरकारकडे जातच असतो'
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला. या आरोपामुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'नाना पटोले महाराष्ट्रातील महत्त्वाची व्यक्ती आहे. प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीचा सुरक्षेचा अहवाल सरकारकडे जातच असतो. त्यामुळे नानांनी ही बाब फार गांभीर्याने घेऊ नये', असे मत संजय राऊतांनी व्यक्त केले आहे.
मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांना नाना पटोलें(Nana Patole)च्या आरोपांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, नानांनी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन विधान केले असेल, असे मला वाटत नाही. मुळात, राजकारणात पाळत ठेवणे, याचे खूप वेगवेळे अर्थ निघतात. राज्यातील बड्या नेत्यांच्या सुरक्षेची माहिती सरकारकडून घेतली जाते. मलाही सुरक्षा आहे, माझीही माहिती सरकारकडे असेल, असे राऊत म्हणाले.
नानांनी गांभीर्याने घेऊ नये
राऊत पुढे म्हणाले, मोठ्या नेत्यांना सुरक्षा दिल्यानंतर कुठे जातो? काय करतो? एखाद्या ठिकाणी गेल्यामुळे धोका आहे का? याची माहिती नेहमी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री घेत असतात. नाना पटोले(Nana Patole) हे राज्यातील अति महत्त्वाची व्यक्ती आहेत. आज तरी महाराष्ट्राच्या राजकारणात ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे नानांनी या विषयाला फार गांभीर्याने घेऊ नये. अशी विधाने होत असतात. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं, असेही राऊत म्हणाले.
काय म्हणाले होते नाना पटोले ?
नाना पटोले यांनी लोणावळ्यामध्ये कार्यकर्त्यांच्या एका सभेवेळी हे वक्तव्य केले होते. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे. आयबीचा, पोलिसांचा रिपोर्ट रोजच्या रोज सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर नेऊन दिला जात आहे. आताही मी कुठे आहे, राज्यात कुठे कुठे काय सुरु आहे, कुठे आंदोलन होत आहे याची माहिती त्यांना पोहोचवली जात आहे. मी स्वबळाचा नारा दिल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने त्यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. तसेच, आपण त्यांच्यासोबत सरकारमध्ये आहोत, परंतू त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री पदे आहेत. यामुळे त्यांच्याकडून असे यापुढेही होणार आहे, असे पटोले म्हणाले होते.