सोनिया गांधीच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष; कार्यकारिणीचे शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 02:29 AM2020-08-25T02:29:18+5:302020-08-25T02:31:29+5:30
काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्याचे अधिकार बहाल
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : तब्बल सात तासांच्या बैठकीनंतर काँग्रेस कार्यकारिणीने सोनिया गांधी याच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी असतील, यावर शिक्कामोर्तब केले. अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन बोलावून नवीन अध्यक्षांची निवड होईपर्यंत या पदावर राहून त्यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे, असा ठराव संमत करून कार्यकारिणीने त्यांना आवश्यक संघटनात्मक बदल करण्याचे अधिकार दिले. सूत्रांनुसार फेब्रुवारी-मार्च २०२१ च्या आधी काँग्रेसचे अधिवेशन होण्याची शक्यता नाही. यात राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपविण्याची तयारी केली जाईल.
काँग्रेसच्या २३ नेत्यांनी लिहिलेल्या पत्राचा उल्लेख सोनिया गांधी यांनी बैठकीच्या समारोपाप्रसंगी केला. या पत्राने मी खूप दु:खी-कष्टी झाले; परंतु, काँग्रेस एक परिवार आहे, काँग्रेस परिवाराच्या एकजुटीसाठी काम करण्याचा मानस आहे. या परिवाराची एकजूट हीच खरी काँग्रेसची ताकद व मूळ भावना आहे, असे त्यांनी म्हटल्याचा दावा सूत्रांनी केला.
बातम्यांमध्ये लोकमतची आघाडी
काँग्रेस नेत्यांचे नाराजीपत्र, त्यामुळे पक्षात सुरू झालेले वाद आणि सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याची केलेली तयारी या सविस्तर बातम्या ‘लोकमत’नेच सर्वांत आधी दिल्या होत्या.
लवकरच समिती देणार अभिप्राय
पक्षाच्या उच्चपदस्थ सूत्रांनुसार, सोनिया गांधी लवकरच चार किंवा पाच सदस्यांची एक समिती स्थापन करणार आहेत. ही समिती पक्षाचे दैनंदिन कामकाज, संघटनात्मक फेरबदल, सदस्य अभियान आणि महाअधिवेशनासंबंधी नेतृत्वाला आपला अभिप्राय देईल. कार्यकारिणीने सर्वसंमतीने सोनिया गांधी यांना पक्ष संघटनेत आवश्यक ते बदल करण्याचे अधिकारही प्रदान केले आहेत. सूत्रांनुसार, पक्षात लवकरच काही उपाध्यक्षांची नियुक्ती आणि सरचिटणीस स्तरावर फेरबदल होण्याची शक्यता आहे.
पक्षांतर्गत मुद्द्यांची सार्वजनिक चर्चा नको
बैठकीत केलेल्या आणखी एका ठरावात पक्षांतर्गत मुद्द्यांवर मीडियाच्या माध्यमातून किंवा सार्वजनिक व्यासपीठावर मते व्यक्त न करता पक्षपातळीवरच मते मांडण्याचा सल्ला नेत्यांना देण्यात आला आहे.