सोनिया गांधी की राहुल गांधी?; काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून राज्यातील नेत्यांमध्ये मतभिन्नता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 11:38 PM2020-08-23T23:38:34+5:302020-08-23T23:39:12+5:30

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पक्षाध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांना साकडे घातले आहे. तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सोनिया गांधी यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे, असे म्हटले आहे.

Sonia Gandhi or Rahul Gandhi ?; Disagreement among state leaders over Congress presidency | सोनिया गांधी की राहुल गांधी?; काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून राज्यातील नेत्यांमध्ये मतभिन्नता

सोनिया गांधी की राहुल गांधी?; काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून राज्यातील नेत्यांमध्ये मतभिन्नता

Next

मुंबई : काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ आणि प्रभावी नेतृत्व मिळावे, यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पाठविलेल्या पत्राने पक्षात खळबळ उडाली आहे. शिवाय, पक्षाचे नेतृत्व कोणी करावे यावरूनही राज्यातील नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचे दिसून आले.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पक्षाध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांना साकडे घातले आहे. तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सोनिया गांधी यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे, असे म्हटले आहे. दरम्यान संबंधित पत्र म्हणजे राहुल गांधी यांच्याविरोधातील राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केला आहे.

आतापर्यंत बंद खोलीत जी षडयंत्रे रचली जात होती ती या पत्राच्यारुपाने समोर आली आहेत. या षडयंत्राला एकच उत्तर आहे, ते म्हणजे राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पद स्वीकारणार नसल्याचा आपला हट्ट सोडून द्यावा. त्यांनी पक्षाचे नेतृत्व हाती घ्यावे आणि
राज्याराज्यात पक्षाची होणारी पडझड थांबवावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यकारिणीने राजीनामा द्यावा
सोनिया गांधी यांनी राजीनामा कशासाठी द्यायचा? त्यापेक्षा केंद्रीय कार्यकारणीच्या सर्व सदस्यांनी राजीनामे देत बाजूला व्हायला हवे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. या पराभवाला सर्वच जबाबदार आहेत. कार्यकारिणीसुद्धा या पराभवाला जबाबदार असल्याचे सांगत आतापर्यंत किती सदस्यांनी राजीनामे दिले, असा सवालही निरुपम यांनी केला.

चव्हाण, वासनिक, देवरा यांच्या सह्या
काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ आणि प्रभावी नेतृत्व मिळावे, यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पाठविलेल्या पत्रावर महाराष्टÑातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक आणि माजी खासदार मिलिंद देवरा या तीन नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

‘राहुल गांधी परत या’ - थोरात यांची हाक
प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘राहुल गांधी परत या’ची हाक दिली आहे. थोरात यांनी रविवारी सोशल मीडियातून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाचे नेतृत्व स्वीकारावे, असे आवाहन केले आहे. आपल्या सक्षम नेतृत्वाखाली आम्ही सर्व काँग्रेसजन कोटयवधी भारतीयांचा आवाज बनू, आपल्या मार्गदर्शनाखाली देशातील गरीब आणि दुर्लक्षित घटकांसाठी काम करू. आपल्या नेतृत्वाखाली इतिहास घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे थोरात यांनी म्हटले आहे.

Web Title: Sonia Gandhi or Rahul Gandhi ?; Disagreement among state leaders over Congress presidency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.