सोनिया गांधी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडणार?; कुटुंबाबाहेरील व्यक्तीची निवड होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 01:10 AM2020-08-23T01:10:44+5:302020-08-23T07:51:39+5:30
सोमवारी कार्यसमितीची बैठक, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी व्यक्त केलेल्या इच्छेला अनुसरुनच हा निर्णय सोनिया गांधी घेत आहेत.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यसमितीची बैठक सोमवारी होत असून यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी अध्यक्ष पदावरून दूर होण्याबाबतचा प्रस्ताव ठेवू शकतात. उच्चस्तरीय सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी आपल्या मनाची तयारी केली असून, निवडक नेत्यांना याबाबत माहिती दिली आहे की, गांधी कुटुंबाशिवाय अन्य व्यक्ती अध्यक्षपदावर येण्यासाठी त्या या पदावरुन दूर होऊ शकतात.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल आणि आनंद शर्मा यांच्यासह अन्य नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाचे पुनर्गठन करण्याची मागणी केली होती; पण सीडब्ल्यूसीने ते फेटाळून लावत सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्षपदी निवड केली होती. मात्र, हा प्रयोगही अयशस्वी राहिला आणि आता सोनिया गांधी हे पद सोडण्याचा प्रस्ताव देऊ शकतात. अर्थात, हंगामी अध्यक्षपदाचे आणखी एक वर्ष त्यांच्याकडे आहे. मात्र, नाराज असलेल्या सोनिया गांधी हे पद सोडण्याबाबत प्रस्ताव मांडू शकतात.
याबाबत संपर्क साधला असता कोणत्याही ज्येष्ठ नेत्याने यावर टिप्पणी केली नाही. सीडब्ल्यूसीचे ज्येष्ठ सदस्य मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, या व्हर्च्युअल मीटिंगमध्ये आपण सहभागी होणार आहोत.
राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी व्यक्त केलेल्या इच्छेला अनुसरुनच हा निर्णय सोनिया गांधी घेत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी पद सोडले होते. त्यांनी अशीही इच्छा व्यक्त केली होती की, या पदासाठी गांधी कुटुंबाशिवाय अन्य नेत्याची निवड केली जावी.