काँग्रेसची सर्व अकाउंटस् ट्विटरने केली अनलॉक; राहुल गांधी म्हणाले, ‘सत्यमेव जयते’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 07:39 AM2021-08-15T07:39:20+5:302021-08-15T07:39:56+5:30
Rahul Gandhi : अकाउंट अनलॉक झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ‘सत्यमेव जयते’ असे ट्वीट केले. काँग्रेसच्या मुख्य अकाउंटवरूनही असेच ट्वीट करण्यात आले.
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व नेत्यांसह पक्षाचीही अधिकृत खाती ट्विटरने अखेर अनलॉक केली. दिल्लीत बलात्कार करून हत्या झालेल्या नऊ वर्षांच्या मुलीच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो ट्वीट केल्यामुळे ट्विटरने कारवाई करून हे सर्व अकाउंट लॉक केले होते. त्यानंतर राहुल गांधींसह काँग्रेसच्या नेत्यांनी ट्विटरवर पक्षपाती असल्याचा आरोप केला होता.
अकाउंट अनलॉक झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ‘सत्यमेव जयते’ असे ट्वीट केले. काँग्रेसच्या मुख्य अकाउंटवरूनही असेच ट्वीट करण्यात आले. मात्र, इन्स्टाग्रामवरून राहुल गांधी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवरून वाद कायम आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने फेसबुकच्या अधिकाऱ्यांना समन्स बजावून १७ ऑगस्टला हजर राहण्यास सांगितले आहे. राहुल गांधी यांचे ट्विटर खाते गेल्या आठवड्यात लॉक करण्यात आले होते. त्यानंतर काँग्रेसने त्यांचे ट्वीट शेअर करून ट्विटरला आव्हान दिले होते. हे ट्वीट शेअर करणारे नेते तसेच मुख्य अकाउंट्सह पक्षाच्या इतर अकाउंटवरही कारवाई करण्यात आली होती. ट्विटरने राहुल गांधींसह इतर नेत्यांचे अकाउंट अनलॉक केले.