वासनिक म्हणाले, ‘सॉरी’ दुखावण्याचा हेतू नव्हता; लेटरबॉम्ब टाकणाऱ्यांची आज तलवार म्यान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 01:22 AM2020-08-25T01:22:52+5:302020-08-25T08:32:32+5:30
कार्यसमितीच्या कायम आमंत्रित सदस्य रजनीताई पाटील यांनीही बैठकीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेच पक्षाला उत्तम नेतृत्व देऊ शकतात ही बाजू धरून लावली.
विकास झाडे
नवी दिल्ली : कॉँग्रेस कार्यसमितीच्या सात तास झालेल्या बैठकीत बराच वेळ हा रविवारी वरिष्ठ नेत्यांनी पक्षश्रेष्ठींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेल्या लेटरबॉम्बवर गेला. कॉँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी त्यांच्याकडून झालेल्या प्रकारावर दिलगिरी व्यक्त केली. माझ्याकडून असे अनवाधानाने घडले, कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता अशी खंत त्यांनी बैठकीत व्यक्त केली.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आज बैठकीत पक्षाचे कोषाध्यक्ष अहमद पटेल यांनी या तिन्ही नेत्यांच्या कृतीची निंदा करीत यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती याकडे लक्ष वेधले, त्यावेळी गुलाम नबी आझाद यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु मुकुल वासनिक यांनी माझ्याकडून अनवधानाने असे झाले असल्याचे सांगत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आनंद शर्मा यांनीही वासनिकांच्या सुरात सूर मिळवला. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही आज यावर भाष्य करण्याचे टाळले.
कार्यसमितीचे कायम आमंत्रित सदस्य खा. राजीव सातव यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची बाजू लावून धरली. पक्षात सामूहिक नेतृत्वातून निर्णय घेतले जात नाहीत या आरोपाचा सातव यांनी बैठकीत चांगलाच समाचार घेतला. मी गुजरातचा प्रभारी आहे या काळात पक्षश्रेष्ठींनी कोणताही निर्णय घेताना मला आणि प्रदेशाध्यक्षांनाच विचारून घेतला आहे. महाराष्ट्रात प्रभारी आणि प्रदेश अध्यक्षाला वगळून कोणते निर्णय पक्षश्रेष्ठीने घेतले ते टीकाकारांनी सांगावे. असे कोणतेही राज्य नाही की, तेथील प्रदेश अध्यक्ष आणि प्रभारीला न विचारता निर्णय घेतले जातात. दहा वर्षे डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते, हे सरकार सामुहिक नेतृत्वातून चालले नाही का? ज्यांनी आता पक्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांनी आधी मंत्रिपदेही भोगले आहे. त्यांचे पक्षासाठी किती योगदान होते? याचे मुल्यमापन व्हायला नको का? असा सवालही खा. सातव यांनी उपस्थि केल्याचे सुत्राने सांगितले. आपण बैठकीत दिलगिरी व्यक्त केली का? असे ‘लोकमत’ने एसएमएसद्वारा मुकुल वासनिक यांना विचारले असता त्यांनी उशिरा ‘नो’ असे उत्तर दिले.
उत्तम नेतृत्व
कार्यसमितीच्या कायम आमंत्रित सदस्य रजनीताई पाटील यांनीही बैठकीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेच पक्षाला उत्तम नेतृत्व देऊ शकतात ही बाजू धरून लावली. कॉँग्रेस एकसंघ ठेवण्याचे आणि सामूहिक नेतृत्व देण्याचे कौशल्य केवळ त्यांच्यातच आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.