पवार साहेब, प्रचाराला येऊ नका, लोकांचा गोंधळ उडेल; काँग्रेस नेत्याचं पत्र ठरतंय चर्चेचा विषय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 05:01 PM2021-03-17T17:01:01+5:302021-03-17T17:09:45+5:30
west bengal assembly election 2021: पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला येऊ नका; शरद पवारांना काँग्रेसचं आवाहन
नवी दिल्ली/कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. राजकीय सभा, आरोप-प्रत्यारोप यांच्यामुळे वातावरण तापलं आहे. राज्यात सत्ताबदल घडवण्यासाठी भारतीय जनता पक्षानं संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींसमोर आव्हान उभं राहिलं आहे. तृणमूलनं स्टार प्रचारकांच्या यादीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा समावेश केला आहे. त्यामुळे आता राजकीय गुंतागुंत वाढली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या खास माणसावर शरद पवार नाराज; गृहमंत्रालयात हस्तक्षेप करत असल्याची तक्रार
पश्चिम बंगालमध्ये भाजप, तृणमूल आणि काँग्रेस-डावे अशी तिहेरी लढत होत आहे. शरद पवारांनी यापैकी तृणमूलच्या बाजूनं उभं राहण्याची गरज व्यक्त केली. यानंतर काँग्रेसचे नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी शरद पवारांना पत्र लिहिलं आहे. पश्चिम बंगालमध्ये येऊन तृणमूलचा प्रचार करू नका, असं आवाहन त्यांनी पत्रात केलं आहे. तुम्ही स्टार प्रचारक म्हणून बंगालमध्ये आल्यास मतदारांचा गोंधळ होईल. त्यामुळे तृणमूलसाठी प्रचार करणं टाळा, असं भट्टाचार्य यांनी पत्रात नमूद केलं आहे. न्यूज१८ इंडियानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
शरद पवारांच्या 'या' पॉवरबाज खेळीने काँग्रेसच विरोधकांपासून वेगळी पडण्याची शक्यता...
काय म्हणाले होते शरद पवार?
देशात तिसरी आघाडी तयार करण्याबद्दलचं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. 'देशात तिसरी आघाडी तयार करण्याची गरज आहे. यासाठी विविध राजकीय पक्षांशी बोलणी सुरू आहे,' असं पवार म्हणाले होते. आपल्या भूमिकेला सीपीआयएमचे प्रमुख सीताराम येचुरी यांनी पाठिंबा दिल्याचंदेखील त्यांनी सांगितलं होतं.
पश्चिम बंगाल निवडणूक, ममता बॅनर्जींबद्दल काय बोलले होते पवार?
पश्चिम बंगालसारख्या राज्यात केंद्रीय नेतृत्त्वाकडून सुरू असलेले हल्ले पाहता लोकशाहीचा आदर करणाऱ्या कोणत्याही पक्षानं ममता बॅनर्जींना पाठिंबा द्यायला हवा, असं विधान पवारांनी केलं होतं. यानंतर लगेचच पश्चिम बंगालमधल्या काँग्रेस नेत्यानं पवारांना पत्र पाठवलं. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या विरोधात लढणाऱ्या ममतांना समर्थन आणि महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेत वाटेकरी, अशी भूमिका घेऊ नका, असा अप्रत्यक्ष इशारा काँग्रेसनं पवारांना दिल्याचं बोललं जात आहे.