Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 08:38 PM2024-10-19T20:38:26+5:302024-10-19T20:38:26+5:30
Navya Haridas vs priyanka Gandhi wayanad lok sabha by election: काँग्रेसने पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांना वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर भाजपाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. नव्या हरिदास यांना भाजपाने मैदानात उतरवले आहे.
who is Navya Haridas: वायनाड लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपा कोणाला मैदानात उतरवणार याबद्दल उत्सुकता होती. अखेर भाजपाकडूनवायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आला असून, नव्या हरिदास (Navya Haridas) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाड अशा दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही मतदारसंघात ते विजयी झाले होते. त्यानंतर वायनाड लोकसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली.
प्रियंका गांधी विरुद्ध नव्या हरिदास
वायनाड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे प्रियंका गांधी यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या उमेदवारीची चर्चा राहुल गांधींनी या मतदारसंघाचा राजीनामा दिल्यापासून सुरू होती. काँग्रेसने गांधी कुटुंबातीलच व्यक्तीलाच वायनाडमधून उमेदवारी दिल्याने भाजपा कोणाला उमेदवारी देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. भाजपाने नव्या हरिदास यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नव्या हरिदास विरुद्ध प्रियंका गांधी अशी लढत होणार, हे स्पष्ट झालं आहे.
नव्या हरिदास कोण आहेत?
भाजपाने प्रियंका गांधी यांच्याविरोधात मैदानात उतरवलेल्या नव्या हरिदास कोण आहेत, अशीही चर्चा होत आहे. नव्या हरिदास या मॅकेनिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी केरळमधील कालिकत विद्यापीठाशी सलग्नित केएमसीटी इंजिनिअरिंग महाविद्यालयातून बी.टेकचे शिक्षण घेतले आहे.
एडीआरच्या (Association for Democratic Reforms) च्या माहितीप्रमाणे त्या १ कोटी २९ लाख ५६ हजार २६४ रुपयांच्या संपत्तीच्या मालकीण आहेत. त्या कोझिकोडे महापालिकेत नगरसेवक होत्या. सध्या त्या भाजपाच्या केरळ महिला मोर्चाच्या महासचिव आहेत. भाजपाने त्यांना कोझिकोड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.
२०२१ कोझिकोड दक्षिण विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत नव्या हरिदास तिसऱ्या स्थानी राहिल्या होत्या. काँग्रेसचे अहमद देवरकोविल यांनी इंडियन यूनियन मुस्लीम लीगच्या उमेदवार नूरबीना राशिद यांचा १२ हजार ४५९ मतांनी पराभव केला होता. तर नव्या हरिदास यांना २४ हजार ८७३ मते मिळाली होती.