"गांधी कुटुंबाने काँग्रेस सोडावी; मोदी, शहा, नड्डा सेल्फमेड नेते"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 10:39 AM2020-12-11T10:39:41+5:302020-12-11T10:41:30+5:30

Ramachandra Guha Over BJP And Congress : सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आहेत कारण त्यांचा संबंध गांधी कुटुंबाशी आहे असं गुहा यांनी म्हटलं आहे.

Why The Gandhis Must Go Now by Ramachandra Guha | "गांधी कुटुंबाने काँग्रेस सोडावी; मोदी, शहा, नड्डा सेल्फमेड नेते"

"गांधी कुटुंबाने काँग्रेस सोडावी; मोदी, शहा, नड्डा सेल्फमेड नेते"

Next

नवी दिल्ली - इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आपल्या एका लेखामध्ये गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी असं परखड मत व्यक्त केलं आहे. गुहा यांनी आपल्या लेखामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस कधीच भाजपाला पर्याय म्हणून पुढे येऊ शकत नाही असंही म्हटलं आहे. तसेच रामचंद्र गुहा यांनी आपल्या या लेखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा देखील उल्लेख केला आहे. भाजपाचे हे तिन्ही प्रमुख नेते एकमेकांशी वैचारिक पातळीवर जोडलेले आहेत. तसेच या तिघांनाही राजकारण हे वारसा म्हणून मिळालेलं नाही.

मोदी, शहा आणि नड्डा या तिघांमध्येही हिंदुत्वावर आधारित राजकारण पुढे घेऊन जाण्याची ताकद असून सध्या ते तेच करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसची परिस्थिती उलट असून तिथे तिन्ही मोठे नेते वैचारिक पातळीवर एकमेकांशी जोडलेले दिसत नाहीत. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आहेत कारण त्यांचा संबंध गांधी कुटुंबाशी आहे असं गुहा यांनी म्हटलं आहे. गांधींनी आता जाणं गरजेचे का आहे? असा एक लेख गुहा यांनी लिहिला आहे. या लेखात त्यांनी आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे. 

"मोदी, शहा आणि नड्डांमध्येही हिंदुत्वावर आधारित राजकारण पुढे नेण्याची ताकद"

गुहा यांनी राहुल गांधी हे राजकारणासंदर्भात किती गंभीर आहेत हे सांगताना बिहार निवडणुकीचे उदाहरण दिलं आहे. निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये राहुल गांधी सुट्ट्यांसाठी निघून गेले होते असं म्हटलं आहे. राहुल यांच्या या दौऱ्याचा उल्लेख राष्ट्रीय जनता दलाच्या एका नेत्याही केल्याची आठवण गुहा यांनी करुन दिली. तसेच गुहा यांनी याच बाबतीत भाजपाचं कौतुक केलं आहे. काँग्रेसच्या उलट भाजपाने निवडणूक जिंकल्यानंतर लगेच अध्यक्ष असणारे जे. पी. नड्डा हे अशा ठिकाणी दौरा करण्याची घोषणा केली जिथे पक्षाने वाईट कामगिरी केली आहे असं आपल्या लेखात म्हटलं आहे. 

"भाजपा आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या विचारसरणीमध्ये मोठा फरक"

भाजपा आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या विचारसरणीमध्ये मोठा फरक आहे. काँग्रेसचे जेवढे टीकाकार आहेत त्याहून अधिक भाजपाचे आहेत मोदी सरकारच्या धोरणांचे विश्लेषण केले आहे. मी ज्या काँग्रेसचा समर्थक होतो ती महात्मा गांधीची काँग्रेस आहे. त्या काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवू देत देशामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या मुल्यांची जोपासना करण्याला प्राधान्य दिलं होतं. मात्र आज काँग्रेस स्वत:ला स्वयंघोषित धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणवते आणि दुसरीकडे मवाळ हिंदुत्वाचे धोरण अवलंबताना दिसत आहे असं गुहा यांनी म्हटलं आहे.

"सेल्फमेड नेते, भाजपाचे हे तिन्ही प्रमुख नेते एकमेकांशी वैचारिक पातळीवर जोडलेले"  

काँग्रेस एकीकडे आपण उदारमतवादी असल्याचे सांगत त्याचे श्रेय घेते. तर दुसऱ्या दिवशी ते उद्योजकांना विरोध करताना दिसतात असं गुहा यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आणि भाजपाच्या नेतृत्वामध्ये तीन मुद्द्यांवरुन खूप मोठा फरक लक्षात येतो असं गुहा यांनी लेखात म्हटलं आहे. भाजपाचे नेतृत्व हे सेल्फ मेड म्हणजेच स्वत: घडवलेलं नेतृत्व आहे. ते वैचारिक स्तरावर एका पातळीवर आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते कोणत्याही मोठ्या कुटुंबातून आलेले नाहीत असं म्हटलं आहे.

"विरोधी पक्षांना एकत्र घेऊन आघाडी स्थापन करुन कणखर पर्याय निर्माण केला पाहिजे"

पुढच्या लोकसभा निवडणुकींसाठी अजूनही तीन वर्षे बाकी आहेत. या कालावधीमध्ये काँग्रेसने स्वत:ला पुन्हा उभं केलं पाहिजे. भविष्यातील नेतृत्व पक्षबांधणीच्या माध्यमातून समोर आणलं पाहिजे. इतर विरोधी पक्षांना एकत्र घेऊन आघाडी स्थापन करुन कणखर पर्याय निर्माण केला पाहिजे असं गुहा यांनी म्हटलं आहे. गुहा यांनी आपल्या लेखात स्पष्टपणे गांधी कुटुंबाने केवळ काँग्रेसच्या प्रमुख नेतृत्वावरुनच नाही तर पक्षापासूनच दूर जाण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबते वृत्त दिले आहे. 

Web Title: Why The Gandhis Must Go Now by Ramachandra Guha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.