पवार-पाटील संघर्षाला ३५ वर्षांचा इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 04:21 PM2019-09-11T16:21:47+5:302019-09-11T16:23:04+5:30
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील संघर्षाची धग कायम राहिली आहे.
- रविकिरण सासवडे
बारामती :लोकसभेला मदत करून सुद्धा पवारांनी मला फसवलं , असा आरोप करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील गोटात दाखल झाले खरे, परंतू इंदापूर तालुक्यात पाटील-पवार संघर्षाला ३५ वर्षांचा इतिहास आहे. आठव्या आणि अकराव्या लोकसभेसाठी हर्षवर्धन पाटील यांचे चुलते शंकराव पाटील आणि शरद पवार यांच्यात थेट लढत झाली होती. या दोन्ही लढतीत पवार विजयी झाले होते. इंदापूर विधानसभा मतदार संघ राष्ट्रीय काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला राहिला आहे. बारामती तालुक्याच्या जवळचा मतदार संघ म्हणून या तालुक्यातील मतदारांवर पवार घराण्याचा प्रभाव आहे. समाजवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर १९८४ साली शरद पवार यांनी काँग्रेसच्या शंकरराव पाटील यांचा पराभव केला होता. मात्र १९८५ साली शरद पवार यांनी लोकसभा सदस्यात्वाचा राजिनामा दिल्याने पोटनिवडणुक झाली. यावेळी काँग्रेसकडून शंकरराव पाटील तर जनता पक्षाच्या वतीने संभाजीराव काकडे यांनी निवडणुक लढवली होती. या निवडणुकीत देखील पवार-पाटील घराण्यात सुप्त संघर्ष दिसून आला होता. जनता पक्षाच्या संभाजीराव काकडे यांनी शंकरराव पाटील यांचा पराभव केला. या निडणुकीत शरद पवार यांनी शंकरराव पाटील यांच्या विरोधात काकडे यांना पाठिंबा दिल्याचे बोलले जाते. दरम्यान १९८९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांनी काँग्रेस (आय) पक्षात प्रवेश झाला. या लोकसभेसाठी काँग्रेसकडून पुन्हा शंकरराव पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांनी भाजपच्या संभाजीराव काकडेयांचा पराभव केला. यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १९९१ सालीपार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी पुतने अजित पवार यांच्यासाठी राजकिय खेळी खेळली. विद्यमान खासदार शंकरराव पाटील यांना डावलून अजित पवार यांच्यासाठी काँग्रेसकडून तिकीट मिळवण्यात शरद पवार यशस्वी झाले. अजित पवार यांनी ही निवडणुक जिंकली. त्यानंतर १९९६ साली लोकसभेसाठी पुन्हा एकदा काँग्रेसकडून शरद पवार, तर काँग्रेसने डावलल्यामुळे अपक्ष म्हणून शंकरराव पाटील यांनी पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकला. पवार यांनी अपक्ष उमेदवार शंकरराव पाटील यांच्या विरोधात ४ लाख २७ हजार ५५९ मते मिळवली, आणि विजयी झाले.यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये इंदापूरमधून सलग चार वेळा हर्षवर्धन पाटील आमदार झाले. पवार-पाटील घराण्याती संघर्ष कमी करत २०१४ चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सांगता सभा घेतल्या. मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवारआणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील संघर्षाची धग कायम राहिली आहे.
* हर्षवर्धन पाटील यांनीच लावला काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरूंग
१९९१ ते १९९६ केंद्रात मंत्री असलेल्या शरद पवार यांनी महाराष्ट्र काँग्रेसवर चांगली पकड होती. १९९५ साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान इंदापूरचे तत्कालिन काँग्रेसचे आमदार गणपतराव पाटील यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील यांनी बंडाचे निशाण फडकवले. हर्षवर्धन पाटील यांनी घड्याळाच्या चिन्हावर अपक्ष निवडणुक लढवली. आतापर्यंत काँग्रेसच्या पारड्यात आपले मत टाकणाºया येथील मतदारांनी प्रथमच काँग्रेसच्या विद्यमान आमदारास पराभूत करून बंडखोर हर्षवर्धन पाटील यांना निवडूण दिले होते. प्रथमच आमदार झालेले हर्षवर्धन पाटील तत्कालिन युती शासनाच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री देखील झाले होते. यानंतर देखील १९९९ च्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचे किसन नरूटे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुरलीधर निंबाळकर यांच्यासोबत अपक्ष हर्षवर्धन पाटील यांचा सामना झाला. याही निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा कॉँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करीत
हर्षवर्धन पाटील आमदार झाले. २००४ मध्ये देखील पाटील यांनी अपक्ष राहूनच विजय मिळवला होता. १९९६ साली काँग्रेसपासून दुरावलेल्या पाटील घराण्याने २००९ व २०१४ मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला.
--------------------