Amol Kolhe: पवारांना सोडलेला राजकारणी टिकत नाही; नाव न घेता कोल्हेंनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 04:23 PM2024-09-12T16:23:24+5:302024-09-12T16:23:59+5:30

भाजपमध्ये मेगा भरती होत होती, मात्र ती सूज होती की खरेच तयार केलेली बॉडी होती? हे आता समजले असेल

A politician who abandons sharad pawar does not last The foxes roamed without calling names | Amol Kolhe: पवारांना सोडलेला राजकारणी टिकत नाही; नाव न घेता कोल्हेंनी लगावला टोला

Amol Kolhe: पवारांना सोडलेला राजकारणी टिकत नाही; नाव न घेता कोल्हेंनी लगावला टोला

पुणे: ‘भारतीय जनता पक्षातील मेगा भरती म्हणजे पावडर खाऊन केलेली बॉडी आहे, हे आता सर्वांच्या लक्षात आले आहे. अशी बॉडी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोडून केलेला राजकारणी टिकत नाही. राज्यात निष्ठा व प्रामाणिकपणाला महत्त्व आहे, असा टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.

खासदार कोल्हे यांनी बुधवारी दुपारी पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले. कसबा, दगडूशेठ, मंडई या मंडळांना त्यांनी भेट दिली आणि गणपतीची आरती केली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती त्यांच्या हस्ते झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप तसेच शहरातील अन्य पदाधिकारी त्यांच्यासमवेत होते.

डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फुटून बाहेर गेलेल्यांवर टीका केली. त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही, मात्र त्यांचा रोख उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांकडेच होता. भारतीय जनता पक्षात मेगा भरती होत होती, मात्र ती सूज होती की खरेच तयार केलेली बॉडी होती? हे आता समजले असेल. महाराष्ट्रात निष्ठा व प्रामाणिकपणा याला महत्त्व आहे, असेही ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार, पुण्याचे ग्रामदैवत तथा मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपतीची मनोभावे आरती केली. ज्याप्रमाणे गणरायाने स्वराज्याच्या लढ्यास बळ दिले त्याच प्रमाणे स्वराज्याचा स्वाभिमान अबाधित राखण्यासाठी पुकारलेल्या लढ्यासही बळ द्यावे अशी मनोभावे प्रार्थना केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देश-विदेशातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करून मनोभावे प्रार्थना केली.पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाचा मानबिंदू असलेल्या गणेशोत्सवाची उज्वल परंपरा त्याच दिमाखात पुढे सुरू ठेवण्याचे काम अनेक मंडळांकडून केले जाते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे नाव या परंपरेत नेहमीच अग्रस्थानी घेतले जाईल. मंडळाची हीच उज्वल परंपरा यापुढेही सुरू राहावी अशा सदिच्छा व्यक्त करत मंडळाच्या सर्व सदस्यांना व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. कष्टकऱ्यांचा बाप्पा म्हणून १८९४ सालापासून सर्वसामान्यांचे श्रद्धास्थान असलेल्या अखिल मंडई मंडळाच्या शारदा गणेशाची मनोभावे आरती केली. गणरायासमोर नतमस्तक होत महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांच्या कष्टाला शेतकऱ्याच्या घामाला हक्काचे मोल मिळावे अशी प्रार्थना केली.

Web Title: A politician who abandons sharad pawar does not last The foxes roamed without calling names

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.