पालिकेच्या मुख्य अभियंत्यास शिवीगाळ; आमदार रवींद्र धंगेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 12:39 PM2024-02-08T12:39:31+5:302024-02-08T12:49:03+5:30

पुणे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांना धंगेकर यांनी शिवीगाळ केला होता

Abusing the chief engineer of the municipality MLA Ravindra Dhangekar granted pre-arrest bail | पालिकेच्या मुख्य अभियंत्यास शिवीगाळ; आमदार रवींद्र धंगेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

पालिकेच्या मुख्य अभियंत्यास शिवीगाळ; आमदार रवींद्र धंगेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे : महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यास शिवीगाळ आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एन. शिंदे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

२६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता १२ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे आशानगर, वैदुवाडी, गोखलेनगर तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील ६० लाख लिटर्स क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचा उद्घाटन कार्यक्रम पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाची जबाबदारी फिर्यादी व महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांच्यावर सोपविण्यात आली होती.

रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण लोकार्पण करणार असल्याचे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. धंगेकर आणि त्यांचे कार्यकर्ते पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यासाठी जमले. कार्यकर्ते मोठ्याने घोषणाबाजी करीत होते. दरम्यान धंगेकर यांनी पालिकेच्या मुख्य अभियंत्यास शिवीगाळ केली. याप्रकरणी २९ जानेवारी रोजी फिर्याद देण्यात आली. त्यानुसार धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. धंगेकर यांनी ॲड. नितीन भालेराव यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. आरोपी व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने धंगेकर यांना अटी-शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. ॲड. भालेराव यांना ॲड. आकाश चिकटे, ॲड. अक्षय बडवे, ॲड. मयूर चौधरी आणि स्वप्निल दाभाडे यांनी मदत केली.

Web Title: Abusing the chief engineer of the municipality MLA Ravindra Dhangekar granted pre-arrest bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.