आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 03:34 PM2024-05-08T15:34:35+5:302024-05-08T15:35:06+5:30
शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोडेगाव इथं जाहीर सभा पार पडली.
Ajit Pawar Speech ( Marathi News ) : पश्चिम महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात असून त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हे निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने पवार काका-पुतण्याने ही लढाई प्रतिष्ठेची केली आहे. या पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोडेगाव इथं जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. तसंच आंबेगावच्या जुन्या पॅटर्नवर भाष्य करत लोकांना आवाहनही केलं आहे.
मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र असं असतानाही लोकसभा निवडणुकीत मात्र या तालुक्याने अनेकदा तेव्हा शिवसेनेत असणाऱ्या आढळराव पाटलांच्या बाजूने कल दिला होता. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, "आढळरावांना लोकसभेला आणि दिलीप वळसे पाटलांना विधानसभेला असं मतदान तुम्ही आजवर करत आले ना? आता बाबांनो असं काही करू नका," असं म्हणत अजित पवार यांनी मतदारांना विधानसभेला वेगळी आणि लोकसभेला वेगळी अशी भूमिका न घेण्याचं आवाहन केलं आहे.
कोल्हेंवर जोरदार टीका
अजित पवार यांनी आजच्या सभेत पुन्हा एकदा अमोल कोल्हेंचा जोरदार समाचार घेतला आहे. "आताचे खासदार काहीही कागदपत्रे दाखवतात आणि म्हणतात मी अजित दादांकडे पाठपुरावा केला. गडी अलीकडच्या तारखा टाकतोय आणि कागद नाचवतोय. धादांत खोटं बोलतो हा माणूस. मी प्रत्येकाची कामं नक्की करतो. आता भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटलांना विचारा, ते विरोधात असतानाही मी कामं करायचो. कारण उद्या ते आपल्याकडे परतही येतील, शेवटी राजकारण आहे," असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, "आता लक्षात ठेवा हे भावनिक करतील, आता माझा पुतण्या बारामतीत लढला. आता काय रडून प्रश्न सुटणार आहेत का? तुमचे प्रश्न भावनिकतेने सुटणार नाहीत ," असा टोलाही अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला लगावला आहे.