पुणे लोकसभेवर अजितदादांचा दावा; काँगेस जागा न सोडण्यावर ठाम, आघाडीचे मतभेद चव्हाट्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 01:30 PM2023-05-28T13:30:27+5:302023-05-28T13:31:02+5:30
गिरीश बापटांच्या निधानामुळे रिक्त जागेवर आम्ही कोणाचाच दावा मान्य करणार नाही, ही जागा काँग्रेसच लढवणार
पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधानामुळे रिक्त झालेल्या जागेवर आता खुद्द अजित पवार यांनीच दावा केला आहे. आघाडीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेसकडे असूनही पवार यांनी त्यावर राष्ट्रवादीचा दावा केला आहे. तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत हा जागा सोडणार नसल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. यामुळे पोटनिवडणूक जाहीर होण्याआधीच महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
टिंबर मार्केट येथे गुरुवारी घडलेल्या आगीच्या दुर्घटनेतील नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजित पवार सकाळीच पुण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी पोटनिवडणूक जाहीर होणार असल्याची माहिती असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आता लोकसभेची मुदत संपण्यात फक्त वर्षाचा कालावधी बाकी असल्याने पोटनिवडणूक घेणार नाहीत असे वाटत होते, मात्र आता मला अशी माहिती मिळाली आहे की पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार आहे.
सध्याची राजकीय स्थिती अशी आहे की, पोटनिवडणूक किंवा निवडणूक प्रत्येक जागा विरोधकांनी जिंकायला हवी. त्यानुसार व्यूहरचना करावी लागेल. पुणे शहरात आमची राजकीय ताकद जास्त आहे. महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही ती दाखवली. आमचे ४० पेक्षा जास्त नगरसेवक होते तर काँग्रेसचे फक्त १०. अशा स्थितीत ही जागा हातची का घालवायची? असा विचार आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवावी असे आमचे म्हणणे असल्याचे पवार यांनी सांगितले. जिथे ज्यांची ताकद जास्त ती जागा त्यांनी लढवावी, असे साधे सूत्र आहे असेही ते म्हणाले.
पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण
जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने पोटनिवडणुकीची सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण केली आहे. मतदान यंत्रांपासून सर्व सज्जता प्रशासनाची आहे. मतदार याद्या अद्ययावत करणे, मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान यंत्रांची तपासणी अशी सर्व कामे झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
''राजकीय ताकद कोणाची जास्त हे कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दिसून आले आहे. अजित पवार काय म्हणाले? ते माहिती नाही, मात्र पुणे शहर लोकसभेच्या जागेवर आम्ही कोणाचाच दावा मान्य करणार नाही. ही जागा काँग्रेसचीच व पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर ती काँग्रेसच लढवेल. यातून महाविकास आघाडीत पुण्यामध्ये काहीही मतभेद वगैरे होणार नाहीत. - मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस''