कोण म्हणालं पुण्याची जागा काँग्रेसकडे : चर्चा सुरु असल्याचे अजित पवारांचे सूतोवाच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 03:57 PM2018-12-22T15:57:29+5:302018-12-22T15:58:42+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीत पुण्याची जागा काँग्रेस लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र अजून जागा निश्चिती झाले नसल्याचे सांगितले आहे.
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत पुण्याची जागा काँग्रेस लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र अजून जागा निश्चिती झाले नसल्याचे सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस इच्छुकांमध्ये धडधड वाढली असून राष्ट्रवादीतील इच्छूकांचे मात्र चेहरे उजळले आहेत.
पुण्यातील कार्यक्रमात पवार यांनी याविषयी मत प्रदर्शित केले असून आत्तापर्यंत फक्त लोकसभेच्या ४० जागांबाबत निर्णय झाला असल्याचे सांगितले. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मिळून आघाडीच्या जागा वाटपाबाबत निर्णय घेताना अजूनही पुण्यासह सुमारे आठ जागांचा तिढा कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या जागावाटपात कुठल्याही परिस्थितीत ताकदवान पक्ष किंवा इलेक्टिव्ह मेरिट हाच निकष लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निकषानुसार ज्या पक्षाची ताकद संबंधीत भागात जास्त आहे त्याच पक्षाच्या उमेदवाराला निवडणूक लढवण्याची संधी दिली जाणार आहे.
यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडी करण्याबाबतही भाष्य केले असून समविचारी पक्षांना एकत्र घेण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. आंबेडकर पुढील आठवड्यात भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्याविषयी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात चर्चा झाल्याचेही समजते.