'एकाच दिवशी एकाच वेळी १ ० लाख खात्यात पैसे' गृहमंत्री अमित शाह यांनी साधला राहुल गांधींवर निशाणा
By राजू इनामदार | Updated: February 22, 2025 18:54 IST2025-02-22T18:52:58+5:302025-02-22T18:54:24+5:30
'हा मोदींचा चमत्कार आहे राहुलबाबा' असा टोला देत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लगावला

'एकाच दिवशी एकाच वेळी १ ० लाख खात्यात पैसे' गृहमंत्री अमित शाह यांनी साधला राहुल गांधींवर निशाणा
पुणे : जनधन खाती आम्ही सुरू केली त्यावेळी राहुलबाबा म्हणाले, "खाती सुरू केली, पैसे कुठे आहेत?" आज एकाच दिवशी एकाच वेळी १० लाख जणांच्या खात्यात पैसे जमा झाले, 'हा मोदींचा चमत्कार आहे राहुलबाबा' असा टोला देत केंद्रीय ग्रुहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत २० लाख घरांना मंजूरीपत्र वितरण व प्रथम हप्ता वितरण शाह यांच्या हस्ते झाले. बालेवाडी क्रिडा संकुलात शनिवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ व्यासपीठावर उपस्थित होते.
शाह म्हणाले, "माझे घर व्हायला हवे या स्वप्नाची पूर्ती होत आहे. स्वत:चे घर, त्यात शौचालय, सोलर व आता यापुढे गँसचा सिलेंडरही मिळेल. देशातील प्रत्येकाला घर, वीज, धान्य देणे हीच पंतप्रधान मोदी यांची विकसीत भारत संकल्पना आहे. शौचालय देऊन गरिबांचा स्वाभिमान मोदींनी जपला आहे. कोणत्याही देशाच्या प्रमुखांनी फक्त १० वर्षात ६० लाख लोकांना घर, धान्य देण्याचे काम केले नाही.
महायुती सरकारनेही चांगले काम केले आहे असे शाह यांनी सांगितले. अटल सेतू हा एक चमत्कारच आहे. अनेक क्षेत्रात मोठी कामे सुरू आहेत. महाराष्ट्रातुल जनतेने महायुतीला ऐतिहासिक बहुमत तर दिलेच पण, ‘कौनसी सेना असली, कौनसी एनसीपी असली’ हा निकालही
दिला असे शाह म्हणाले.
फडणवीस म्हणाले, “शाह यांनी बटण दाबले आणि लोकांच्या खात्यात पैसे जमा व्हायला लागले, मेसेजेस येत आहेत. १३ लाख ५७ हजार घरे पहिल्या व दुसर्या टपप्यात २० लाख घरे दिली मोदींनी. १०० दिवसांत २० लाख घरांना मान्यता मिळावी सांगितले आणि ग्रामविकास खात्याने फक्त ४५ दिवसात काम केले. त्यातील १० लाख घरांना पहिला हप्ता वितरीत झालाही. राज्यातील २८ हजार ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यातून लोक जोडले गेलेत, कार्यक्रम पाहताहेत. आता घर बांधायला २ लाख रूपये मिळतील, सोलरसाठी अनुदान मिळेल, त्यातून आयुष्यभर मोफत विज मिळेल. मोदींनीच हे करायला सांगितले.” बांधलेल्या घरावर भगिनीचे, पत्नीचे नाव असलेच पाहिजे असे फडणवीस यांनी बजावले.
अजित पवार म्हणाले, “महामानवांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम केंद्र सरकार करते आहे. हा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे. पंतप्रधान मोदी २ कोटी घरे देशात देणार आहेत. त्यातील मोठा वाटा राज्याला मिळावा असा आमचा प्रयत्न आहे.”
एकनाथ शिंदे म्हणाले, “प्रधानमंत्री मोदी खरी महाशक्ती आहेत. देशाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाणारे आहेत. आता या २० लाख कुटुंबात प्रेमाचा संसार फुलणार आहे. जिसका कोई नही उसका मोदी आणि शाह है! लाडकी बहिण योजना बंद होणार नाही”
ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रास्ताविक केले. ४५ दिवसात २० लाख घरांना मंजूरी देणे सोपे नव्हते. हा विक्रम आहे असे त्यांनी सांगितले. अभियानाची माहिती देणारी पुस्तिका व पोस्टरचे शाह यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ग्रामविकास सचिव एकनाथ डवले यांनी आभार व्यक्त केले.