“शरद पवारांना पंतप्रधान, तर अजित दादांना मुख्यमंत्रीपदी बसलेलं बघायचंय, कामाला लागा”
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 11:29 AM2021-10-02T11:29:27+5:302021-10-02T11:34:39+5:30
पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून, येत्या निवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे.
पुणे: गेल्या काही दिवसांपासून आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत असून, आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना पंतप्रधानपदी तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मुख्यमंत्रीपदी बसलेलं पाहायचे आहे, अशी मोठी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. (amol kolhe says desire to see sharad pawar as a prime minister and ajit pawar as a chief minister)
पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेच्या आढावा बैठकीत खासदार अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात वक्तव केले आहे. पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता ऋण फेडण्याची वेळ आली आहे. यासाठी कार्यकर्त्यांची फळी, नेत्यांची मोट बांधून झुंजार अन् लढाऊ वृत्ती आपण दाखवून दिली पाहिजे, असे आवाहन अमोल कोल्हे यांनी यावेळी उपस्थितांना केले.
देशाच्या पंतप्रधानपदी शरद पवारांना पाहायचेय
माझ्यासाठी तुम्ही जीवाचे रान केले, माझ्यासाठी पायाला भिंगरी लावून पळालात. आता तुमच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आहे. शरद पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालत आहेत. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळतेय ही भाग्याची गोष्ट आहे. शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागणे गरजेचे आहे. शरद पवारांना पंतप्रधान, तर अजित दादांना मुख्यमंत्रीपदी बसलेले बघायचेय, असेही अमोल कोल्हेंनी यावेळी म्हटले आहे.
अजित पवारांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेले बघायचेय
शिरुरच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमाला अजित पवारांसोबत होतो. त्या इमारतीचा कोपरा ना कोपरा ते पाहत होते. त्यावेळी मनात विचार आला की, याच पद्धतीने अजित दादांनी पिंपरी चिंचवड शहराची सूत्रे हातात असताना इथली प्रत्येक गोष्ट न्याहाळली असेल. पुन्हा हा योग पिंपरी चिंचवड शहरात कधी येणार? पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा मला माझ्या नेत्याला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेले बघायचेय, ही माझी भावना आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. येत्या निवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून येथील नेत्यांनी शरद पवार यांना पिंपरी चिंचवड मध्ये लक्ष घाला अशी विनंती केली होती. त्यानुसार शरद पवार १३ ऑक्टोबरला माजी नगरसेवकांची बैठक घेणार आहेत, तर १६ तारखेला मेळावा घेणार आहेत. शरद पवार यांना पंतप्रधान या सर्वोच्च पदावर बसलेले पाहायचे असेल, तर त्यांना पिंपरी-चिंचवड सारख्या शहरात लक्ष घालायला लागू नये, अशी भावना अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे .