भाजपच्या अधिवेशनाला काँग्रेसचे अधिवेशनानेच उत्तर; मुंबईत २० ऑगस्टला राहुल गांधी, खर्गे यांच्या उपस्थितीत होणार
By राजू इनामदार | Published: July 23, 2024 06:53 PM2024-07-23T18:53:57+5:302024-07-23T18:55:44+5:30
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने काँग्रेसला चांगली साथ दिली,एकही खासदार नसलेल्या काँग्रेसला राज्याने तब्बल ११ खासदार दिले.
पुणे: भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अधिवेशन नुकतेच पुण्यात झाले. काँग्रेस या अधिवेशनाला अधिवेशनानेच उत्तर देत आहे. मुंबईत २० ऑगस्टला प्रदेश काँग्रेसचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी तसेच पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे या अधिवेशनात मुख्य वक्ते असतील. राज्य विधानसभा निवडणुकीचे रणशिंग काँग्रेस या अधिवेशनातून फुंकणार आहे. अन्य काही राष्ट्रीय नेत्यांनाही अधिवेशनाला खास निमंत्रित करण्यात येणार आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अधिवेशनाच्या संदर्भात काही गोष्टी ठरवण्यासाठी म्हणून मंगळवारी दिवसभर दिल्लीत पक्षनेत्यांच्या भेटी घेत होते. राज्यस्तरावरील एका नेत्याने ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने काँग्रेसला चांगली साथ दिली. एकही खासदार नसलेल्या काँग्रेसला राज्याने तब्बल ११ खासदार दिले. विधानसभा निवडणुकीतही हाच ट्रेंड कायम रहावा यासाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई ही काँग्रेसचे नेते दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जन्मभूमी आहे. त्याचे स्मरण म्हणून हे अधिवेशन मुंबईत प्रस्तावित करण्यात आले आहे. मागील काही वर्षात राज्यातील कोणत्याही निवडणुकीत काँग्रेसला लक्षणीय यश मिळालेले नाही. अनेक नेते काँग्रेस सोडून भाजपत गेले. स्थानिक स्तरावरही पक्षाची राजकीय अवस्था क्षीण झाली आहे. तरीही लोकसभेला काँग्रेसने राज्यात चांगले यश मिळवले. भाजपच्या विरोधात काँग्रेसने घेतलेली ठाम भूमिका मतदारांना पटली असल्याचे मतदानातून दिसून आले. हीच भूमिका कायम आहे हे मतदारांना सांगण्यासाठी म्हणून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे अधिवेशन घेण्यात येत आहे असे सांगण्यात आले.
राज्यातील सर्व नव्याजुन्या नेत्यांना, आजी माजी खासदार, आमदार, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना अधिवेशनाला निमंत्रीत करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या शताब्दी वर्षाचा कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत मुंबईत घेण्यात आला होता. त्यानंतर प्रथमच इतका मोठ्या स्वरूपात राज्याचे अधिवेशन आयोजित करण्यात येत आहे. मुंबईतील स्थळ अद्याप निश्चित झालेले नाही, मात्र रेसकोर्स किंवा असेच मोठे मैदान ठरवण्यात येणार आहे.