डिझेल पेट्रोल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:57 PM2018-04-09T12:57:47+5:302018-04-09T12:57:47+5:30
भाजपा सरकारच्या डिझेल पेट्रोलची दरवाढ, दलितांवरील वाढते अन्याय आदी धोरणांचा व निष्क्रियतेचा निषेध नोंदविण्याकरिता कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता लोणावळा शहर कॉग्रेसच्या वतीने सोमवारी (दि. ८ एप्रिल) शिवाजी चौकात लक्षणिक उपोषण करण्यात आले.
लोणावळा : डिझेल पेट्रोलची दरवाढ, दलितांवरील वाढते अन्याय,अत्याचार, महागाई, बेरोजगारी, शेतीमालाला हमीभाव, आदी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले विविध विषय हाताळण्यात सत्ताधारी भाजप सरकारला पूर्णत: अपयश आल्याने याची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसू लागली आहे. भाजपा सरकारच्या या धोरणांचा व निष्क्रियतेचा निषेध नोंदविण्याकरिता कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता लोणावळा शहर कॉग्रेसच्या वतीने सोमवारी (दि. ८ एप्रिल) शिवाजी चौकात लक्षणिक उपोषण करण्यात आले.
यावेळी लोणावळा शहर कॉग्रेसचे अध्यक्ष नारायण आंबेकर, प्रदेश प्रतिनिधी दत्तात्रय गवळी, महिला कॉग्रेसच्या अध्यक्षा डॉ. वैशाली चिंतामणी, नगरसेवक निखिल कविश्वर, राजु गवळी, जितूभाई टेलर, बाबुभाई शेख, सुबोध खंडेलवाल, विलास बडेकर, परशुराम शिर्के, विलास विकारी, बाळासाहेब भानुसघरे, सुखदेव बालगुडे, सत्तार शेख, वसंत भांगरे, बलराज रिले, शोभा लांडगे, मीरा लोंढे,रेखा बोभाटे,सारिका बोभाटे, माधुरी उठवाल, सुनिल मोगरे, जे.बी.बक्षी, संजय थोरवे यांच्यासह अनेक जण या उपोषणात सहभागी झाले होते. सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्नांवर हे उपोषण असल्याने अनेकांनी याला पाठिंबा दर्शवत उपोषणकर्त्यांच्या भेटी घेतल्या.