Pune: शरद पवारांच्या अदानी समर्थनाने काँग्रेस अस्वस्थ; मविआच्या बैठकीला काहीजण गैरहजर

By राजू इनामदार | Published: April 8, 2023 05:31 PM2023-04-08T17:31:23+5:302023-04-08T17:33:39+5:30

पुढील महिन्यात १४ मेला पुण्यात महाविकास आघाडीची एकत्रित सभा होणार आहे...

Congress upset by Sharad Pawar's Adani support; Some leader absent meeting of Mahavikas aghadi | Pune: शरद पवारांच्या अदानी समर्थनाने काँग्रेस अस्वस्थ; मविआच्या बैठकीला काहीजण गैरहजर

Pune: शरद पवारांच्या अदानी समर्थनाने काँग्रेस अस्वस्थ; मविआच्या बैठकीला काहीजण गैरहजर

googlenewsNext

पुणे : ज्या उद्योगसमुहाला केंद्र सरकार अभय देत आहे म्हणून काँग्रेस देशभरात रान उठवत आहे, त्याच उद्योग समुहाचे शरद पवार यांनी समर्थन केल्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या पुण्यातील प्रस्तावित सभेच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयात शनिवारी दुपारी झालेल्या बैठकीला काही काँग्रेसजन गैरहजर होते. शहराध्यक्ष व अन्य काही पदाधिकारी मात्र बैठकीला उपस्थित होते.

पुढील महिन्यात १४ मेला पुण्यात महाविकास आघाडीची एकत्रित सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात यासाठीच्या नियोजनाची बैठक झाली. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रविंद्र माळवदकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी गटनेते आबा बागूल, सुनील शिंदे, संगीता तिवारी, नीता परदेशी, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे उपस्थित होते. काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी तसेच संजय बालगुडे, विरेंद्र किराड तसेच अन्य बरेच पदाधिकारी मात्र या बैठकीला उपस्थित नव्हते.

काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी अदानी उद्योग समुहावरून भारतीय जनता पक्षाला संसदेसह सगळीकडे धारेवर धरले आहे. असे असताना शरद पवार यांनी त्याच उद्योगसमूहाचे समर्थन करावे, त्यांचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे असे म्हणावे याचा अर्थ काय समजायचा असे शहरातील काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राहूल गांधी यांनी देशभर निर्माण केलेला टेंपो पवार यांच्या या वक्तव्याने कमी झाली अशी या पदाधिकाऱ्यांची भावना आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे मुख्य उद्दीष्ट भाजपला जेरीस आणायचे हे असताना त्यालाच खीळ बसेल असे वक्तव्य कशासाठी असा त्यांचा प्रश्न आहे.

शहराध्यक्ष शिंदे यांनी सांगितले की ही बैठक त्या सभेच्या नियोजनाची होती. क्वार्टर गेट येथील मैदानात ही सभा होणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीने राज्यात सगळीकडे अशा सभा होणार आहेत. त्याचे नियोजन एकत्रितपणे करावे असा पक्षाचा आदेश आहे. त्याप्रमाणे ही बैठक होती. बैठकीत फक्त त्यावरच चर्चा झाली. जबाबदाऱ्या ठरल्या. अन्य विषयांबाबत प्रदेशकडून जी काही भूमिका येईल त्याचे पालन केले जाईल.

Web Title: Congress upset by Sharad Pawar's Adani support; Some leader absent meeting of Mahavikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.