‘भारत जोडो’ द्वारे काँग्रेसचा पुनर्जन्म होणार; डॉ. गणेश देवी यांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 03:46 PM2022-12-09T15:46:41+5:302022-12-09T15:47:28+5:30
आजचा अंधार दूर होऊन उद्याची पहाट उजाडणार
पुणे : सामाजिक, राजकीय आणि अध्यात्मिक उद्देशाने काढण्यात येत असलेल्या ‘भारत जोडो’द्वारे काँग्रेसचा पुनर्जन्म होईल, असा विश्वास गांधीवादी ज्येष्ठ विचारवंत व भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केला. आजचा अंधार दूर होऊन उद्याची पहाट उजाडणार आहे, असेही ते म्हणाले.
डाॅ. देवी म्हणाले की, एकशे दोन वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांनी अहमदाबादपासून गदगपर्यंत झंझावाती प्रवास केला. त्यात त्यांना काही नवीन अनुयायी मिळाले. त्यावेळी गांधीजींचे वय होते ५२ वर्षे. याच वयात राहुल गांधी देशातील द्वेषाचे वातावरण संपविण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून समाजाला जोडण्याचे काम करीत आहेत.
सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १८व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत 'भारत जोडो' पदयात्रेतील छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. देवी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
लढा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण देशाला काँग्रेस बनायला पाहिजे
इंग्रज देशावर राज्य करीत होते, तेव्हा त्यांच्याविरूद्ध लढणाऱ्या एका सामाजिक संघटनेचा जन्म महाराष्ट्रात झाला. त्या संघटनेचे नाव ‘काँग्रेस’. समाजात निर्माण झालेले तणाव, आरएसएसचे दुफळी माजवणारे धोरण, भाजपच्या समाज तोडण्याच्या विघातक प्रवृत्तीमुळे समाजाचे विघटन होत आहे. ते कमी करून समाजाला एकत्र आणण्यासाठी भारत जाेडाे यात्रा काढली जात आहे. हा लढा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण देशाला काँग्रेस बनायला पाहिजे, असेही डाॅ. देवी म्हणाले.