पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावरून काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस समोरासमोर, तणावाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 12:42 PM2024-01-26T12:42:09+5:302024-01-26T12:53:20+5:30

यावेळी काही काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस एकमेकांसमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते....

Congress workers and police face to face over inauguration of water tank, atmosphere of tension | पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावरून काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस समोरासमोर, तणावाचे वातावरण

पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावरून काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस समोरासमोर, तणावाचे वातावरण

पुणे :पुणे महापालिकेच्यावतीने आशानगर येथे पाण्याची वीस लाख लीटर क्षमतेची टाकी उभारण्यात आली आहे. या टाकीच्या उद्घाटन समारंभासाठी भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुढाकार घेतला असून आज दुपारी एक वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. मात्र या पाण्याच्या टाकीला जागा मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी प्रयत्न केले होते. त्यांना या टाकीच्या उद्घाटन कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे सकाळपासून स्थानिक माजी नगरसेवक दत्ता बहिरट, काँग्रेसचे काही कार्यकर्ते तसेच उबाठा गटाचे कार्यकर्ते यांनी या टाकीचे उद्घाटन करण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून गर्दी केली होती. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना अडवले. यावेळी कसबा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर आल्यावर त्यांनी पोलिसांना जाब विचारला. यावेळी काही काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस एकमेकांसमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमासाठी सन्मानाने बोलावले नाही तर काँग्रेस पक्षाच्यावतीने या टाकीचे नियोजित कार्यक्रमाआधी म्हणजे सकाळी ११ वाजता उद्घाटन केले जाणार होते. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे दिसत आहे. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे काही वेळ त्याठिकाणी तणावाचे वातावरण तयार झाले होते.

आशानगर, वैदूवाडी, म्हाडा वसाहत, चतु:श्रुंगी परिषद, बहिरटवाडी, जनवाडी, जनता वसाहत यासह विविध भागांमध्ये पाणी पुरेशा दाबाने मिळत नव्हते. त्यामुळे या भागात पाण्याची टाकी उभारण्यासाठी साडेचार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र या टाकीसाठी जागा उपलब्ध होत नव्हती. या टाकीला मोफत जागा उपलब्ध होण्यासाठी माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी प्रयत्न केले. त्यातून ही जागा पालिकेला मोफत उपलब्ध झाली. त्यानंतर या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करावे, असा ठराव पुणे महापालिकेत मंजूर करण्यात आला होता. या ठरावाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी दत्ता बहिरट यांनी पत्रकार परिषदेत केली होती.

काँग्रेसने केलेल्या कामाचे श्रेय घेवू नका

पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन झाले पाहिजे. भाजप स्वतः काम करत नाही मात्र काँग्रेसने केलेल्या कामाचे श्रेय घेत आहे, अशी टीका माजी आमदार मोहन जोशी यांनी केली.

Web Title: Congress workers and police face to face over inauguration of water tank, atmosphere of tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.