"निर्णय घेण्याची क्षमता असणाऱ्यांना निर्णय मान्य...", अजित पवारांची अध्यक्षांच्या निकालावर प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 11:15 AM2024-01-12T11:15:14+5:302024-01-12T11:15:46+5:30
पुणे विभागातील जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यांना मंजुरी देण्यासंदर्भातील बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते...
पुणे : जे न्यायाधीश असतात, ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता असते त्यांनी दिलेला निकाल हा मान्यच करायचा असतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली.
पुणे विभागातील जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यांना मंजुरी देण्यासंदर्भातील बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी शिवसेनेसंदर्भातील मोठा राजकीय निर्णय जाहीर केला. त्यावर पवार यांनी काल कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. यासंदर्भात गुरुवारी त्यांना विचारले असता, नार्वेकर यांच्या निकालाचे समर्थन करत पवारांनी वरील प्रतिक्रिया दिली. यानंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले का, असे विचारले असता, आम्ही सरकारमध्येच आहोत, सरकार सुरूच आहे, त्यामुळे त्यांचे अभिनंदन केव्हा करायचे ते मी ठरवेन, मात्र तुम्ही पत्रकारांनी मला फुकटचे सल्ले द्यायचे नाहीत, असा दमही पवार यांनी यावेळी भरला.
नार्वेकर यांच्या निकालावर विरोधकांनी सडकून टीका केल्यानंतर अजित पवार यांना त्यासंदर्भात विचारले असता मी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असतो त्यानुसारच बोलत असतो. त्यामुळे कोण काय बोलले याच्याशी माझे काही घेणेदेणे नाही. राज्यात असे अनेक वाचाळवीर असून त्यांना रोज सकाळी काहीतरी बोलावेच लागते, अन्यथा त्यांना झोप येत नाही. त्यांना उत्तर देण्याचे काम प्रत्येक पक्षाचे प्रवक्ते करत असतात, असेही ते यावेळी म्हणाले.
गुंड शरद मोहोळ याचा खून झाल्यानंतर पुण्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे का, पालकमंत्री म्हणून तुम्ही काय करणार, या प्रश्नावर पवार म्हणाले, मी पुणे व पिंपरीच्या पोलिस आयुक्त तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांशी यासंदर्भात चर्चा करून त्यांना योग्य ते निर्देश देईन. कोणताही राजकीय पदाधिकारी आपापल्या राज्यात कायदा व सुव्यवस्था चांगली राहील यासाठीच प्रयत्न करत असतो. आम्हीदेखील त्या दृष्टीने प्रयत्न करू.
कात्रज येथील डेअरीच्या मैदानावर आरक्षण टाकण्यासंदर्भात निर्माण झालेल्या वादाविषयी विचारले असता महापालिका आयुक्त सध्या शहरात नसल्याने त्यांच्याशी बोलून नंतर सांगेन, असे स्पष्टीकरणही अजित पवार यांनी दिले.