काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक कशी हाेते माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 01:06 PM2022-10-09T13:06:18+5:302022-10-09T13:06:26+5:30

देशभरात ९ हजार मतदार : महाराष्ट्रातून २८० जण करणार मतदान

Do you know how the election of the Congress President was held? | काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक कशी हाेते माहीत आहे का?

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक कशी हाेते माहीत आहे का?

googlenewsNext

राजू इनामदार

पुणे : तब्बल २२ वर्षांनंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. निवडणूक झालीच, तर ती कशी व्हायला हवी याबद्दल पक्षाच्या घटनेत स्पष्टता आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपद घ्यायला नकार दिल्यामुळे आता काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. ८२ वर्षांचे मल्लिकार्जुन खर्गे व ६६ वर्षांचे शशी थरूर यांच्यात ही लढत होत आहे.

पक्षाची संघटनात्मक निवडणूक कशी घ्यायची, त्यांचे मतदार कोण असतील याविषयी पक्षाच्या घटनेत सर्व गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. याआधी २२ वर्षांपूर्वी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी व जितेंद्रप्रसाद यांच्यात निवडणूक झाली होती. त्यात सोनिया गांधी यांची निवड झाली होती. अध्यक्षपदाच्या मतदानासाठी देशभरात ९ हजार मतदार आहेत. प्रत्येक राज्याच्या राजधानीच्या शहरात १७ ऑक्टोबरला मतदान होईल. महाराष्ट्रात २८० जण मतदार आहेत. १९ ऑक्टोबरला दिल्लीतून निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

निवडणूक निरीक्षक

पक्षाने संघटनात्मक निवडणुकीसाठी केंद्रीय स्तरावर मधुसूदन मिस्त्री यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून प्रत्येक राज्यात प्रदेश निरीक्षक, ते आपल्या राज्यातील शहर व गावांमधील पक्ष निवडणुकीसाठी निरीक्षक, ते शहरांमधील ब्लॉक व बूथ कमिटीच्या निवडणुकीसाठी निरीक्षक नियुक्त करतात. पक्षाची तळापासूनची संघटनात्मक निवडणूक या निरीक्षकांच्या देखरेखीखाली होत असते.

अशी आहे रचना :

- बूथ कमिटी
शहरे तसेच गावांमध्येही मतदान केंद्रानुसार बूथ कमिट्या स्थापन केल्या जातात. कमिटीत २५ सदस्य असतात. त्यांच्यातून बूथचा अध्यक्ष निवडला जातो. बूथ कमिटीमधूनच ब्लॉकसाठी प्रतिनिधी पाठवण्यात येतात.

- ब्लॉक कमिटी
पुणे शहरात असे १२ ब्लॉक आहेत. ब्लॉकलाही अध्यक्ष व सदस्य अशी रचना असते. पक्षाचे क्रियाशील सदस्य ब्लॉक अध्यक्षाची निवड करतात. प्रत्येक ब्लॉकमधून शहरासाठी प्रत्येकी ६ याप्रमाणे शहर प्रतिनिधी पाठवण्यात येतात. तसेच प्रत्येकी १ याप्रमाणे प्रदेश प्रतिनिधी निवडले जातात.

- शहर कमिटी
ब्लॉकमधून आलेले शहर प्रतिनिधी, प्रदेश प्रतिनिधी व ब्लॉक अध्यक्ष मिळून शहराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असेल तर मतदान करतात. शहराध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर तो शहर प्रतिनिधींमधून त्याची कार्यकारिणी निश्चित करतो.

- प्रदेश कमिटी
शहर शाखेकडूनही प्रदेश प्रतिनिधींची निवड केली जाते. राज्यातील सर्व ब्लॉक तसेच शहर शाखांमधून निवडले गेलेले प्रतिनिधी प्रदेशाध्यक्षपदासाठी निवडणूक झालीच तर त्यासाठी मतदान करतात. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष प्रदेश प्रतिनिधींमधून त्याची राज्याची कार्यकारिणी तयार करतो.

- राष्ट्रीय समिती
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी राज्यांमध्ये निवडले गेलेले प्रदेश प्रतिनिधी मतदार असतात. देशातून असे ९ हजार प्रदेश प्रतिनिधी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक झालीच तर मतदार असतात. त्यांच्यातून एकूण संख्येच्या १ षष्ठांश सदस्य पक्षाचे राष्ट्रीय समिती सदस्य म्हणून निवडले जातात.

काँग्रेसची अखिल भारतीय कार्यकारिणी

प्रदेशकडून आलेल्या सदस्यांमधून १२ सदस्य या कार्यकारिणीवर निवडले जातात. अध्यक्ष म्हणून निवडून आलेली व्यक्ती त्याच्या पसंतीच्या ११ जणांची निवड करतो. अशी २३ जणांची समिती ही पक्षाची सर्वोच्च समिती असते. राष्ट्रीय अध्यक्ष या समितीचे प्रमुख असतात. पक्षासंबंधीचा कोणताही धोरणात्मक निर्णय या समितीच्या माध्यमातूनच घेतला जातो.

स्थानिक स्तरावर थेट नियुक्तीच

देशातील सर्व राज्यांमधील बूथ, शहर तसेच राज्यस्तरावरच्या निवडणुका झाल्या. त्या नियुक्ती पद्धतीनेच केल्या गेल्या. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक झालेलीच नाही. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी मात्र निवडणूक झालीच तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २४ ते ३० सप्टेंबर अशी होती. आता प्रचार सुरू आहे.

Web Title: Do you know how the election of the Congress President was held?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.