उपमुख्यमंत्री अजित पवार घेतात कोरोनामुळे सर्वतोपरी काळजी पण कार्यकर्ते अजूनही बिनधास्त..
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 12:13 PM2020-10-03T12:13:20+5:302020-10-03T12:14:43+5:30
कोरोनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचे निधन झाले आहे. तरीही पक्षात अजून गांभीर्य नाही.
पिंपरी: कोरोनामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वाधिक काळजी घेतात. मात्र, पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नियमाचा विसर पडला आहे. राजकीय बैठका घेण्यास मनाई असताना नियमाचे उल्लंघन करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला होता.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णसंख्या ८० हजाराच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी राज्य सरकार खबरदारी घेत आहे. अनलॉक पाचमध्येही राजकीय बैठका घेण्यास परवानगी नाही. कोरोना कालावधीत उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वाधिक काळजी घेत आहेत. मास्क, हातमोजे सतत ते परिधान करतात. जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करतात. स्वतःच्या बैठकीत काळजी घेतात. अधिकाऱ्यांना सूचना देतात. पवार हे नियम पाळत असताना त्यांच्या पक्षाला, नगरसेवकांना मात्र, याचा विसर पडला आहे. शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आकुर्डीत आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. सुरक्षित अंतराचे कसलेही पालन झाले नाही. कोरोनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचे निधन झाले आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामात सुधारणा होत नसल्याचे दिसून येते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, '' मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली. जनतेच्या प्रश्नासाठी जनसेवकाची बैठक झाली. सामाजिक अंतर, मास्क आदी नियमांचे पालन करून चर्चा झाली.''.