सोमवारी दिल्लीत ठरणार..! लोकसभेसाठी पुण्यात काँग्रेसचा झेंडा नेमका कुणाच्या हाती..
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 08:24 PM2019-02-23T20:24:28+5:302019-02-23T20:35:11+5:30
सन २०१४ च्या निवडणुकीतही पक्षश्रेष्ठींनी पुण्यातील उमेदवार डावलून बाहेर उमेदवारी दिली. त्याचा परिणाम काय झाला ते दिसत असतानाही पुन्हा तसाच निर्णय झाला तर काय करायचे.....
पुणे: काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीने महाराष्ट्रासाठी नियुक्त केलेल्या स्क्रिनींग कमिटीची सोमवारी (दि. २५) दिल्लीत बैठक होत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल याचा निर्णय त्यातच होण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशावरून शुक्रवारी पुण्यात झालेल्या बैठकीमुळे स्थानिक इच्छुक धास्तावले आहेत. उमेदवार आयात असेल तर काय करायचे याचेच चर्चा चर्वितरण त्यांच्यात शनिवारी दिवसभर सुरू होते.
शेतकरी कामगार पक्ष व त्याआधी संभाजी ब्रिगेडचे राज्य पदाधिकारी असलेले प्रविण गायकवाड तसेच सध्या भारतीय जनता पार्टीचे सहयोगी खासदार असलेले संजय काकडे या दोघांच्या नावांची काँग्रेसचे उमेदवार म्हणून गेले काही दिवस चर्चा सुरू आहे. हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांच्या निकटचे समजले जातात. पवारांनीच त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मागण्यास सुचवले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या स्थानिक इच्छुकांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी आहे.
सन २०१४ च्या निवडणुकीतही पक्षश्रेष्ठींनी पुण्यातील उमेदवार डावलून बाहेर उमेदवारी दिली. त्याचा परिणाम काय झाला ते दिसत असतानाही पुन्हा तसाच निर्णय झाला तर काय करायचे यावर शनिवारी काही नेत्यांमध्ये खल सुरू होता. शुक्रवारी झालेल्या बैठकीत तरी तसेच संकेत दिसत असल्याचे स्थानिक इच्छुकांचे म्हणणे आहे. त्या बैठकीत ह्यतुमच्यात एकमत होत नाही, तर मग पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम करावे लागेल असे स्थानिक इच्छुकांना सांगण्यात आल्याची चर्चा आहे.
दरम्यान दिल्लीत सोमवारी होणारी बैठक ही स्क्रिनिंग कमिटीची बैठक आहे. केंद्रीय निवड समितीने राज्यासाठी म्हणून काही समित्या तयार केल्या आहेत. या समितीत राज्यातील काँग्रेसच्या उमदेवारांबाबत चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी असल्याने पक्षाच्या वाट्याला ४८ जागांपैकी २२ किंवा २३ जागा येण्याची शक्यता आहे. त्या जागांसाठी आलेल्या उमेदवारांबाबत कमिटीत चर्चा होईल. फक्त अर्ज केलेल्याच नाही तर पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या काही बाहेरच्या उमेदवारांचाही बैठकीत विचार होणार आहे. त्यामुळेच स्थानिक इच्छुक धास्तावले आहेत.