'घड्याळ' बंद पडले की काय?; अमोल कोल्हेंनी निमंत्रण पत्रिकाच केली शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 10:50 AM2024-03-04T10:50:32+5:302024-03-04T10:51:14+5:30

मुंबई - नमो रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बारामतीमध्ये विकासकामांची जोरदार बॅटींग केली. यावेळी, बारामतीमधील पोलीस उपायुक्त ...

Has the 'clock' stopped?; Amol Kolhe shared the invitation card of ajit pawar name | 'घड्याळ' बंद पडले की काय?; अमोल कोल्हेंनी निमंत्रण पत्रिकाच केली शेअर

'घड्याळ' बंद पडले की काय?; अमोल कोल्हेंनी निमंत्रण पत्रिकाच केली शेअर

मुंबई - नमो रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बारामतीमध्ये विकासकामांची जोरदार बॅटींग केली. यावेळी, बारामतीमधील पोलीस उपायुक्त कार्यालय आणि बारामती बस स्थानकांचे लोकार्पणही ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. या कामांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचे कौतुक केले. तसेच, पोलीस स्टेशन आणि कार्यालयाच्या बांधकामाचे कौतुक करत, अजित पवारांची याकामी गृहमंत्री म्हणून नक्कीच मदत घेईल, असेही ते म्हणाले. बारामतीतील या सोहळ्याची चांगलीच चर्चा रंगली होती. आता, खासदार अमोल कोल्हे यांनी अशाच एका कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टोला लगावला आहे. 

अजित पवार यांनी बारामतीमधील कार्यक्रमातून विकासाच्या मुद्द्यावर बारामतीकरांना पाठिशी राहण्याचं आवाहन केलं. विशेष म्हणजे या व्यासपीठावर खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या. आता, पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात पोलीस स्टेशन इमारत, पोलिसांची निवासस्थानाचे भूमिपूजन होत आहे. यासाठी निमंत्रण पत्रिका छापण्यात आली असून पत्रिकेवर सर्वकाही आशय लिहिला आहे. प्रमुख पाहुणे, ठिकाण, उद्घाटन कार्यक्रम आणि विनीत, असा मजकूर आहे. मात्र, या निमंत्रण पत्रिकेवर वेळच दिसून येत नाही. त्यावरुनच, खासदार कोल्हे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. 

निमंत्रण मिळाले परंतु निमंत्रण पत्रिकेत “वेळ”च लिहिली नाही. ’घड्याळ’ बंद पडले की काय... असा सवाल करत खासदार कोल्हेंनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे. या उद्घाटन निमंत्रण पत्रिकेत अजित पवार यांचं आणि दिलीप वळसे पाटील यांचेही नाव आहे. त्यामुळेच, अमोल कोल्हेंनी दोन्ही नेत्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला टोमणा मारला आहे. तर, पोलीस बांधवांसाठी चांगली गोष्ट आहे. स्वागत “तुतारी” वाजवून करायला विसरू नका!, असा खोचक टोलाही अमोल कोल्हे यांनी लगावला. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर खासदार अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत राहणे पसंत केले. तर, शरद पवार यांच्या पक्षाची भूमिका मांडताना ते राष्ट्रवादी अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल करताना दिसून येतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी थेट अजित पवारांना उद्देशून काकाच का? अशी कविताही महिला मेळाव्यात केली होती. तर, अमोल कोल्हेंना शिरुर मतदारसंघात पराभूत करण्यासाठी अजित पवारांची यंत्रणा कामाला लागली आहे.

Web Title: Has the 'clock' stopped?; Amol Kolhe shared the invitation card of ajit pawar name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.