५ वर्षात त्याच्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं; अजित दादांची कोल्हेंवर नाव न घेता टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 11:32 AM2023-12-25T11:32:58+5:302023-12-25T11:34:03+5:30
शिरूर मध्ये पर्याय देणार तुम्ही काळजीच करू नका तिथे असलेला उमेदवार निवडूनच आणणार
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवारपुणे दौऱ्यावर आहेत. काल बारामती दौऱ्यावर असताना शरद पवार गटाला नाव न घेता टोला लगावला होता. आजही अजितदादांनी पुण्यात विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. शिरूर मतदार संघाबाबत बोलताना त्यांनी खासदार अमोल कोल्हेंवर नाव ना घेता टीका केली आहे. ५ वर्षात एका खासदाराने त्याच्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं असं ते यावेळी म्हणाले आहेत. तसेच रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला आहे.
अजित पवार म्हणाले, त्यांनी मतदारसंघ दुर्लक्षित केलं होतं. त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचे रान केलं होतं. मी बोलणार नव्हतो. पण यांना आता उत्साह आला आहे. कोणाला पद यात्रा सुचते कोणाला संघर्ष यात्रा काढायची आहे. आम्हाला वाटले होते ते वक्ते उत्तम आहे. संभाजी महाराज यांच्याबद्दल उत्तम भूमिका त्यांनी बजावली होती. शिरूर मध्ये पर्याय देणार तुम्ही काळजीच करू नका तिथे असलेला उमेदवार निवडून च आणणार असल्याचा विश्वास अजित पवार यांनी यावेळी दाखवला आहे.
राज्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, पाण्याचे साठे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. राज्यात सगळीकडे अशी परिस्थिती आहे. कॅबिनेट मध्ये पाण्याची परिस्थिती सांगितली जाते. मुख्यमंत्री, फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत. पाणी पिण्याला द्या आणि नंतर शेतीला द्या. जलसंपदा विभागाला सुद्धा सूचना दिल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाण्याची पातळी पुण्यात कमी आहे. अवकाळी पावसामुळे अनेक फळं आणि पिकांचे नुकसान झाले. तात्काळ पंचनामे सुरू झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे कणखर नेतृत्व
आज देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय कणखर नेतृत्व नाही. देशाचा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली विकास झाल. मी काही ज्योतिषी नाही. पहिल्यांदा महायुतीचे पंतप्रधान उमेदवार मोदी आहेत समोर कोणी आहे का? प्रत्येकाला उभे राहण्याचा अधिकार आहे. मोदी साहेब पाहिजे का दुसरे कोणी पाहिजे. मी स्पष्ट बोलणार आहे. नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पंतप्रधान पदासाठी कोणी ही उमेदवार नाही असेहि त्यांनी यावेळी सांगितले आहे.