कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी ५ ते ६ वर्षांपासून काँग्रेसच्या संपर्कात - सुशीलकुमार शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 09:27 PM2021-09-30T21:27:46+5:302021-09-30T21:36:19+5:30
काँग्रेसच्या विचारांची भूमिका त्यांनी मान्य केल्यानं पक्षात त्याच स्वागतच आहे
पुणे: कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी गेली 5 ते 6 वर्षांपासून हे दोघे काँग्रेसच्या संपर्कात होते. पण त्यांनी कधी येण्याची भूमिका घेतली नाही. पण आत्ता त्यांनी काँग्रेसच्या विचारांची भूमिका मान्य केलेली दिसत आहे. आज काँग्रेस चढत्या क्रमांकावर नसून तर ती खाली खाली येत आहे. अशा वेळी जर ही मंडळी येत काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. असं मत यावेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
''राज्यात काँग्रेस शिवसेनेबरोबर जात असताना काँग्रेसने कॉमन मिनिमम प्रोग्रॅम स्वीकारला आहे. त्यामुळे काँग्रेसने हिंदुत्ववादी अशा काही भूमिका नाही असं देखील शिंदे यांनी यावेळी सांगितलं.''
''ज्याच्या हातात सत्ता होती त्यांना योग्य चालवता आली नाही म्हणून तिन्ही पक्षांना कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर एकत्र यावं लागलं. केवळ सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर जनतेची सेवा करण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले असल्याचं ते म्हणाले आहेत.''
तरुणांना संधी द्यावी लागत नाही ती त्यांनी घ्यावी लागते
''संधी ही घ्यावी लागते. सुशील कुमार शिंदे हे कोणालाच माहीत नव्हते संधी घेतल्यानंतर सगळ्यांना माहीत झालं की सुशीलकुमार शिंदे कोण आहे. म्हणून राजकारणात तरुणांना संधी द्यावी लागत नाही ती त्यांनी घ्यायची असते असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.''
राहुल गांधींच्या उपस्थितीत दोघांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
दरम्यान दोन दिवसापूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि केसी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी या दोन युवा नेते आणि काँग्रेस नेतृत्व यांच्यातील चर्चेमध्ये मध्यस्थी केली आहे. दरम्यान, या प्रवेशापूर्वी शहीद भगतसिंग पार्कमध्ये कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांच्यासोबत उपस्थित राहुल गांधींनी विरोधकांना एक मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.