आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 05:28 AM2024-05-04T05:28:24+5:302024-05-04T05:29:30+5:30
भाजपला संविधान मिटवायचे आहे, पण आमची लढाई संविधान वाचविण्यासाठी
पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर देशात आरक्षणाची असलेली ५० टक्के मर्यादा हटविण्यात येईल. दलित १५ टक्के, अदिवासी ८ टक्के आणि मराठा, धनगर यांच्यासह मागास वर्गास ५० टक्के, असे एकूण ७३ टक्के आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली.
पुणे लाेकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. नरेंद्र मोदी आणि भाजपला संविधान मिटवायचे आहे, असा गंभीर आरोपही गांधी यांनी केला. आमची लढाई ही संविधान वाचविण्याची आहे. संविधान संपविले जाईल, त्यादिवशी तुम्ही भारत देशाला ओळखू शकणार नाही. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आम्ही कधी संपवू देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
राहुल गांधी म्हणाले, संविधान नसेल तर केवळ २५ लोकांच्या हातात देश जाईल. मोदींनी २२ लोकांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विचार केला जात नाही. नरेंद्र मोदी ज्येष्ठ नेत्यांचा (शरद पवार) अपमान करण्यात व्यस्त आहेत. असे वागणे देशाच्या पंतप्रधान पदाला शोभत नाही.
जातीवर आधारित जनगणना करणार; संख्येनुसार सर्वांना संधी
nआमचे सरकार आल्यावर जातीवर आधारित
जनगणना केली जाईल. त्या-त्या जातीच्या संख्येनुसार सर्वांना संधी दिली जाणार आहे. इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर देशात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली जाईल.
nत्याचबरोबर अग्निवीर योजनेसह जीएसटी बंद केला जाईल. सध्या पेपरफुटीचे प्रमाण वाढले आहे. पेपर लीक करणाऱ्यांनाही कडक शिक्षा दिली जाईल. सर्व पेपर सरकारी आयोगामार्फत घेतले जातील.
उन्हाच्या तडाख्याने ऐनवेळी बदलली सभेची वेळ
पूर्वनियोजनाप्रमाणे सभेची वेळ साडेपाच ठेवण्यात आली होती. मात्र, उन्हाचा तडाखा असल्याने ऐनवेळी सभेची वेळ बदलण्यात आली. सभा साडेसहा वाजता सुरू झाली.
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे
उत्तर प्रदेशातील अमेठी हे फार पूर्वीपासून गांधी कुटुंबीयांचा बालेकिल्ला राहिला आहे; परंतु २५ वर्षांत पहिल्यांदाच गांधी कुटुंबातील सदस्य लोकसभेच्या या जागेवरून निवडणूक लढवणार नाही. यंदा काँग्रेसने निष्ठावंत किशोरी लाल शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी दिली आहे.