Maharashtra CM : शिरुर हवेलीसह खेडचे आमदार साहेबांसोबत...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 04:02 PM2019-11-23T16:02:12+5:302019-11-23T16:23:25+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट
पुणे: राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपाला साथ देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांच्यासोबत कोण आणि शरद पवार यांच्यासोबत कोण असा सवाल उपस्थित झाला आहे. मात्र, त्यात खेड आणि शिरुर- हवेली मतदारसंघाच्या आमदारांनी शरद पवार यांच्याबरोबर असल्याचे सांगितले आहे.
शनिवारी (दि.२३) सकाळपासून राज्यातील सत्तास्थापनेचा नाट्यमय प्रकार संपूर्ण जनता अनुभवत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. याविषयी खेडचे आमदार मोहिते - पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी पक्षाकडून बैठकीसाठी बोलावणे झाल्यानंतर तत्काळ मुंबईकडे रवाना झालो असून तासाभरात बैठकस्थळी पोहचणार आहे. तर अशोक ( बापू) पवार हे कुटुंबासह धार्मिक कार्यक्रमासाठी राजस्थान मधील जयपूरला गेले होते. जयपूर येथून ते आज सकाळी पुण्यात परत आले. महाराष्ट्रातील घडामोडीनंतर ते पक्षश्रेष्ठींचा फोन आल्याने ते मुंबईला निघाले. शरद पवार साहेब यांच्यासोबतच एक निष्ठेने व ठाम असल्याचे दोन्हीही आमदारांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले .
मोहिते पाटील म्हणाले, बैठकीत पवार साहेबांकडून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. यापेक्षा अधिक आपल्याला काहीही माहिती नाही. मात्र आपण सर्वेसर्वा शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान पक्षाचे सर्वेसर्वा अर्थातच शरद पवार साहेब जी भूमिका घेतली त्यांनाच पाठिंबा देण्याच्या पोस्ट मोहिते पाटील समर्थकांकडून सोशल मीडियावर झळकत होत्या.
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले, महाराष्ट्र राज्यात ज्या काही घडामोडी घडत आहेत.त्या घडामोडीबाबतीत कोणी काहीही म्हणो मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आहे.