मेट्रो लोणी काळभोरपर्यंत; सोलापूर रस्त्यावरील वाहतूककोंडी सुटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 12:06 PM2020-01-18T12:06:13+5:302020-01-18T12:13:59+5:30

शिवाजीनगर ते लोणी काळभोर अहवाल सादर करावा..

Metro will be going shivajinagar to Loni kalbhor ; Solapur road traffic jam question will be solved | मेट्रो लोणी काळभोरपर्यंत; सोलापूर रस्त्यावरील वाहतूककोंडी सुटणार

मेट्रो लोणी काळभोरपर्यंत; सोलापूर रस्त्यावरील वाहतूककोंडी सुटणार

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यातील आणि पीएमआरडीएच्या विविध विकासकामांचा आणि प्रकल्पांचा आढावा परिसरातील हजारो नागरिकांचा दळणवळणाचा मोठा प्रश्न सुटणार पूर्व हवेलीच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार

पुणे/लोणी काळभोर : उपमुख्यमंत्री अजित पवार व शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) बैठकीत केलेल्या सूचनेनुसार शिवाजीनगर ते हडपसरऐवजी (शेवाळवाडी) लोणी काळभोरपर्यंत मेट्रो मार्ग वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात सतत होत असलेली वाहतूककोंडी सुटण्यास मदत होणार आहे. 
शासकीय विश्रामगृह येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील आणि पीएमआरडीएच्या विविध विकासकामांचा आणि प्रकल्पांचा आढावा घेतला. यामध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा 
घेण्यात आला. या वेळी इतर विषयांसमवेत स्वारगेट ते हडपसर (शेवाळवाडी) मेट्रो मार्ग लोणी काळभोरपर्यंत वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यापूर्वी नियोजित जुन्या आराखड्यानुसार मेट्रो शिवाजीनगर ते हडपसर (शेवाळवाडी) यादरम्यानच धावणार होती. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महामार्गावर सध्या होत असलेल्या व भविष्यात होणाऱ्या वाहतूककोंडीचा विचार करून मेट्रो थेट लोणी काळभोरपर्यंत नेण्यात यावी, असा अहवाल सादर करण्याच्या सूचना पीएमआरडीएच्या अधिकाºयांना केल्या.
या वेळी हडपसरचे आमदार चेतन तुपे, खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील, वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा पोलीस 
अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे उपस्थित होते. 
हिंजवडी ते शिवाजीनगर पहिल्या टप्प्यातील काम झाल्यावर ही मेट्रो पुढे शिवाजीनगर ते लोणी काळभोरपर्यंत नेल्यास रोज शहराच्या वेगवेगळ्या भागांत कामानिमित्त प्रवास करणाऱ्या या परिसरातील हजारो नागरिकांचा दळणवळणाचा मोठा प्रश्न सुटणार आहे. पुणे-सोलापूर मार्गावर हडपसर, मुंढवा, वानवडी, फातिमानगर, शेवाळवाडी, मांजरी, कवडीपाट टोलनाका, कदमवाकवस्ती, लोणी काळाभोर आणि उरुळी कांचन परिसरात वेगाने नागरीकरण वाढत आहे. या भागातील वाढती लोकसंख्या आणि मिळणाऱ्या पायाभूत सुविधा या अत्यंत तुटपुंज्या आहेत. या परिसरातून रोज हजारो नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागांत प्रवास करत असतात. त्यामुळे रस्त्यांवर कायम वर्दळ असते. 
अनेकदा नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना वाहतूककोंडीत तासन्तास अडकून पडावे लागत असल्याचे चित्र नित्याचेच झाले आहे. या पार्श्वभूमीवर हिंजवडी ते शिवाजीनगरला येणारा मेट्रोचा मार्ग शिवाजीनगर ते लोणी काळभोरपर्यंत वाढवल्यास मोठा प्रश्न मिटणार आहे. शिवाजीनगर ते हडपसर (शेवाळवाडी) मेट्रो मार्गातील पहिल्या टप्प्यात हिंजवडी ते शिवाजीनगर असे २३ किलोमीटर मेट्रोचे काम सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप-पीपीपी) करण्यात येत आहे. हे काम प्रामुख्याने पीएमआरडीए आणि महामेट्रो कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. हाच मार्ग पुढे १२ किलोमीटर म्हणजे शिवाजीनगर ते हडपसर (जुना जकातनाका) वाढवण्याची मागणी केंद्राकडे  केली होती. दिल्ली रेल कार्पोरेशन आणि पीएमआरडीएच्या अधिकाºयांच्या संयुक्त बैठकीत मागणी मान्य करण्यात आली आहे. आता यापुढे आणखी १२ किलोमीटर म्हणजे लोणी काळभोरपर्यंत वाढवण्यासाठीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना अजित पवार यांनी पीएमआरडीएच्या अधिकाºयांना दिल्या आहेत. 
..........
23 कि.मी. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम सार्वजनिक खासगी भागीदारीतून करण्यात येत आहे.
.......
12 कि.मी. शिवाजीनगर ते हडपसर दिल्ली रेल कार्पोरेशन आणि पीएमआरडीएच्या अधिकाºयांच्या संयुक्त बैठकीत मागणी मान्य करण्यात आली आहे. 
.........

पूर्व हवेलीच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार
हडपसर ते लोणी काळभोरदरम्यान असलेल्या मांजरी येथील बाजार समिती, महामार्गालगत असलेली अनेक मोठी मंगल कार्यालये यामुळे पुुणे-सोलापूर महामार्गावर कायमच मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करत असलेले प्रवासी, स्थानिक नागरिक, कामगार, विद्यार्थी यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. 
.........
 

Web Title: Metro will be going shivajinagar to Loni kalbhor ; Solapur road traffic jam question will be solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.