माझा काका काही राजकारणी नव्हता! खासदार अमाेल काेल्हेंची अजित पवारांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 09:24 AM2024-03-27T09:24:05+5:302024-03-27T09:25:33+5:30
एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील उमेदवारांसमाेर अजित पवारांना उमेदवार आयात करावा लागताे यातच शरद पवारांचा विजय आहे, असे डाॅ. अमाेल काेल्हे म्हणाले...
पुणे : ‘मी साेन्याचा चमचा ताेंडात घेऊन जन्माला आलाे नाही. माझा काका राजकारणी नव्हता. मला २०१९ मध्ये शरद पवार यांनी संंधी दिली. माझे राजकारणातील अस्तित्व असाे किंवा अभिनय, एमबीबीएसची पदवी मी स्वकर्तृत्वाने, कष्टाने मिळविली आहे. एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील उमेदवारांसमाेर अजित पवारांना उमेदवार आयात करावा लागताे यातच शरद पवारांचा विजय आहे, असे डाॅ. अमाेल काेल्हे म्हणाले.
महायुतीतर्फे शिरूर लाेकसभा मतदारसंघातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली. त्यानंतर मंचर येथे आयाेजित सभेत अजित पवारांनी डाॅ. काेल्हे यांच्यावर केलेल्या टीकेची झाेड उठविली त्याला खा. काेल्हे यांनी पुण्यातील कार्यालयात पत्रकार परिषद घेत उत्तर दिले.
डाॅ. काेल्हे म्हणाले की, शरद पवार यांनी मला उमेदवारी दिली अन् त्यांचा उमेदवार असल्याने जनतेने मला निवडूनही दिले. तेव्हा निवडणुकीचा खर्च पक्षाने उचलला, त्यात काही वावगे नाही. आज संघर्षाच्या काळात मी स्वाभिमानाने त्यांच्यासाेबत उभा आहे, लढताे आहे. महाराष्ट्रात निष्ठेला महत्त्व आहे. नागरिकांना गद्दारी आवडत नाही. महायुतीकडून अद्याप उमेदवार ठरत नव्हता. अखेर आढळराव पाटलांना आयात करून नाइलाजाने उमेदवारी देण्यात आली आहे.
भ्रष्टाचारात नाव नाही म्हणजे मी राजकारणी नाही का?
राजकारणाचा पिंड नाही या टीकेला उत्तर देताना ‘माझे भ्रष्टाचारात नाव नाही म्हणजे मी राजकारणी नाही का?’ असा सवाल डाॅ. अमाेल काेल्हे यांनी उपस्थित केला. तसेच माझा पिंड नसता तर लाेकसभेत अनुपस्थित राहिलाे असताे, मतदारसंघातील जनतेचे प्रश्न पाेटतिडकीने मांडले नसते. तसेच पहिल्याच टर्ममध्ये मला पाच वर्षांत तीन वेळा ‘संसद रत्न’ पुरस्कारही मिळाले नसते. विराेधकांनी वस्तुस्थितीचा विचार केला पाहिजे, असेही डाॅ. काेल्हे म्हणाले.
प्रश्न साेडविण्याऐजवी स्वप्नांची भुरळ :
नागरीकरणाचे प्रश्न साेडविणे, बिबट्यांची दशहत कमी करणे, थ्री फेज वीजपुरवठा, दुधाचे दर, कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी काय प्रयत्न केले? हे सांगण्याऐवजी रिंग राेड, मेट्राे आदी विकासाचे स्वप्न दाखविले जात आहे, असेही डाॅ. अमाेल काेल्हे म्हणाले.