अमोल कोल्हेंविरुद्ध 'हा' उमेदवार द्या; शरद पवार गटाचं दादांना चॅलेंज, पार्थ पवारांनाही टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 03:11 PM2023-12-28T15:11:58+5:302023-12-28T15:13:38+5:30
आता, अजित पवारांना याच विधानावरुन शरद पवार गटाने चॅलेंज दिले आहे.
मुंबई - राष्ट्रवादीतील बंडानंतर शिरुर मतदारसंघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शरद पवारांसोबत राहणे पसंत केले. कोल्हे यांनी जाहीर भाषणातून आपली भूमिका मांडली असून आता शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला लक्ष्य करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांना विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. अमोल कोल्हेंना इशाराच दिला होता. यंदाच्या, निवडणुकीत त्यांना पाडणारच, असं अजित पवार म्हणाले. तर, दिलीप वळसे पाटील आणि मी जीवाचं रान केल्यामुळेच ते शिरुरमधून निवडून आले, असेही त्यांनी म्हटलं होतं. आता, अजित पवारांना याच विधानावरुन शरद पवार गटाने चॅलेंज दिले आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार अमोल कोल्हे यांना उघड आव्हान देत आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव करणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी अमोल कोल्हे यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि अजित पवार यांना प्रत्युत्तरही दिलं. "शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मी सुसंस्कृत राजकारण करणार आहे. मी आहे तिथेच आहे, मात्र ज्यांनी भूमिका बदलली त्यांनी ती का बदलली याचा विचार करणं गरजेचं आहे," अशा शब्दांत कोल्हेंनी अजित पवारांवर पलटवार केला. आता, शरद पवार गटाचे प्रवक्ते विलास लावंडे यांनी अजित पवारांनाच चॅलेंज दिले आहे.
राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटाचे प्रवक्ते विलास लावंडे यांनी अजित पवारांना थेट चॅलेंज दिले. अमोल कोल्हेंविरुद्ध तुम्हाला उमेदवार मिळेना, म्हणून तुम्ही याला-त्याला काड्या करतात. दिलीप वळसे पाटील यांना तुम्ही शिरुर मतदारसंघातून उभे करा. कारण, तुम्ही म्हणालात ना दिलीप वळसे पाटील आणि अजित पवारांनी कष्ट केले म्हणून अमोल कोल्हे निवडून आले. मग, आता दिलीप वळसे पाटील यांनाच उभे करा बघू काय होतंय? कुणाचा गाडा ११ सेकंदाचा आहे ते, असे आव्हानच शरद पवार गटाकडून अजित पवारांना देण्यात आले. तसेच, पार्थ पवार यांना मावळमधून तुम्ही निवडून आणा, पार्थ पवार यांना पुन्हा एकदा मावळमध्ये उभं करा आणि निवडून आणा. विकासाचं तुम्ही काही करणार नाहीत. दिल्लीत तुमचा वट आहे, मग कांद्याचा प्रश्न सोडवा, आमच्या २० हजार मुली गायब आहेत, तो प्रश्न सोडवा. साक्षी मलिकचे अश्रू पुसायला रुपाली चाकणकरांना पाठवा ना, असा घणाघात विलास लावंडे यांनी अजित पवारांवर केला.