"अजित दादावर आमचं प्रेम पण पवार साहेबांना एकटं सोडणार नाही" पुण्यातील NCP कार्यकर्त्यांच्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 11:02 AM2023-07-03T11:02:23+5:302023-07-03T11:03:33+5:30
आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यशवंतराव चव्हाण स्मृती स्थळाच्या दर्शनासाठी शेकडो कार्यकर्त्यांसह कराडला गेले आहेत...
पुणे : रविवारी महाराष्ट्रात मोठा राजकीय उलथापालथ झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ जणांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ या जेष्ठ नेत्यांसह इतर पाच जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ४० आमदरांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवारांनी केला होता. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यशवंतराव चव्हाण स्मृती स्थळाच्या दर्शनासाठी शेकडो कार्यकर्त्यांसह कराडला गेले आहेत.
कालच्या फुटीनंतर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शरद पवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसून आले. यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, कालच्या घटनाक्रमानंतर पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्व पवार साहेबांसोबत आहोत आणि राहू. ही लढाई जातीवाद, धर्मवादाच्या विरोधातील आहे. मागील २५ वर्षांपासून माझ्यासारखे अनेकजण भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेविरोधात लढत आहोत. २०१४ नंतरच्या काळात कोणताही दबाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे नेला.
अजित दादांवर जरी आमचं प्रेम असलं तरी अशा परिस्थितीत शरद पवारांना सोडून जाणे हे कुठल्याच कार्यकर्त्यांना पटले नाही. त्यामुळे आम्ही शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही शरद पवार यांच्यासोबत पुन्हा जोमाने उभे राहून लढू, असा विश्वासही जगताप यांनी व्यक्त केला.
"अजित दादावर आमचं प्रेम पण पवार साहेबांना एकटं सोडणार नाही" पुण्यातील NCP कार्यकर्त्यांच्या भावना#pune#NCPpic.twitter.com/sMnOHlVxKH
— Lokmat (@lokmat) July 3, 2023