Chandrakant Patil: राहुल गांधी हिंदू आहात तर मोगलांनी हिंदू मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 07:34 PM2021-12-13T19:34:04+5:302021-12-13T19:34:44+5:30
मोगलांनी हिंदू मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रमाणे मंदिरांची पुनर्स्थापना करत आहेत त्याप्रमाणे कार्य करावे, असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधी यांना दिले
पुणे : काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपण हिंदू असल्याचे सांगितले असले तरी हिंदू आणि हिंदुत्व असा त्यांचा संभ्रम झाला आहे. ते हिंदू असल्याचे सांगतात. तर त्यांनी मोगलांनी हिंदू मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रमाणे मंदिरांची पुनर्स्थापना करत आहेत त्याप्रमाणे कार्य करावे, असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधी यांना दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी येथील विश्वनाथ मंदिराच्या परिसरातील भव्य विकास कामांचा लोकार्पण कार्यक्रम मोठ्या स्क्रीनवर पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. पुण्यात हडपसर परिसरात मांजराई देवी मंदिराच्या आवारात या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते. राहुल गांधी यांनी आपण हिंदू आहोत पण हिंदुत्ववादी नाही, असे वक्तव्य केल्याबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील आव्हान दिले.
पाटील म्हणाले, राहुल गांधी यांचे वक्तव्य त्यांचा संभ्रम दर्शवतो. हिंदू आणि हिंदुत्ववादी यात काय फरक आहे ? हिंदू धर्म म्हणजे विशिष्ट एकच पूजा पद्धती नाही, तर हिंदू हा गुणवाचक शब्द आहे. जो हिंदू तत्त्वज्ञानाचा आग्रही असतो तो हिंदुत्ववादी असतो. या देशात हिंदू समाजात वेगवेगळ्या पूजा पद्धती निर्माण झाल्या आणि मंदिरे निर्माण झाली. त्यावर मोगलांनी आक्रमण केले. राहुल गांधी स्वतःला हिंदू म्हणत असतील तर त्यांनी मोगलांनी मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध केला पाहिजे.