मोदी जॅकेटनंतर आता राहुल गांधी यांच्या लेदर जॅकेटची फॅशन !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 03:22 PM2018-12-24T15:22:19+5:302018-12-24T15:22:36+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे फॅशन जगतात लोकप्रिय झालेले मोदी जॅकेट काहीसे मागे पडून सध्या राहुल गांधी यांच्या लेदर जॅकेटला मागणी वाढल्याचे दिसत आहे.
पुणे : राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये यश मिळाल्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सर्वत्र चर्चा आहे. काही काळापूर्वी विविध नावांनी हिणवले जाणाऱ्या गांधी यांची सध्या तरुणांमध्ये चांगलीच क्रेझ निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे फॅशन जगतात लोकप्रिय झालेले मोदी जॅकेट काहीसे मागे पडून सध्या राहुल गांधी यांच्या लेदर जॅकेटला मागणी वाढल्याचे दिसत आहे.
नेते किंवा सेलिब्रेटी यांचे अनुकरण करणे भारतात नवीन नाही. विशेषतः त्यांचे कपडे, हेअरस्टाईल, चष्म्याची फ्रेम यांची फॅशन सर्वसाधारणपणे रूढ होते. याचेच उदाहरण २०१४साली बघायला मिळाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे खादी जॅकेट वापरणाऱ्यांची संख्या अचानक वाढलेली दिसून आली. अगदी घरगुती समारंभापासून ते कार्यालयीन कार्यक्रमांपर्यंत मोदी जॅकेट आवर्जून घातले जात होते, अजूनही घातले जात आहे. मात्र याच ट्रेंडला छेद देणारा नवीन ट्रेंड रूढ होत असून त्यात गांधी यांनी प्रचार कालखंडात वापरलेल्या लेदर जॅकेटप्रमाणे जॅकेटला तरुणांची मागणी आहे. अर्थात गांधी यांच्याप्रमाणे काँग्रेसचे राजस्थानचे नेते सचिन पायलट आणि मध्यप्रदेशचे ज्योतिरादित्य सिंधीया यांनीही प्रचारकाळात बहुतांशवेळा लेदर जॅकेट घातले आहे.
याबाबत फॅशन एक्सपर्ट पल्लवी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, अर्थात निवडणुकीनंतर राहुल गांधी स्टाईल हाफ लेदर जॅकेटची मागणी वाढली आहे. मुख्य म्हणजे फक्त कुडत्यांवर न घालता हे जॅकेट टी-शर्ट किंवा फॉर्मल शर्टावरही घालता येत असल्यामुळे तरुणाईची अधिक पसंती आहे. सध्या राहुल यांची ही फॅशन पुण्यातही काँग्रेस कार्यकर्त्यांकडून फॉलो केली जात असून काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह अनेकजण लेदर जॅकेटमध्ये दिसत आहेत. त्यामुळे मोदी यांना राजकीयचं नव्हे तर सर्वच मुद्द्यांवर शह देण्याची काँग्रेसची व्यूहरचना आहे का याची चर्चा राजकीय विश्वात रंगली आहे.