पुण्यात काँग्रेसच्या जुन्या पदाधिकाऱ्यांना हटवा; नव्यांना संधी द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 10:30 PM2020-03-11T22:30:00+5:302020-03-11T22:30:02+5:30
काँग्रेस पक्षाच्या संघटनेत राज्यात अनेक ठिकाणी मोठी धुसफूस सुरू
राजू इनामदार -
पुणे : मध्य प्रदेशातील काँग्रेस फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नाराज पक्ष पदाधिकाऱ्यांकडे लक्ष देण्याचा निर्णय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी घेतला आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांना बदला. नव्यांना संधी द्या, अशी मागणी काँग्रेस अनेक कार्यकर्त्यांनी प्रदेशाने पाठवलेल्या निरिक्षकांकडे केली. पुण्यातील नाराजांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांनी गुरुवारी पक्षाचे निरीक्षक म्हणून प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांना पुण्यात पाठविले. अन्य शहरांमध्येही हा प्रयोग राबवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यात काँग्रेस पक्षाच्या संघटनेत अनेक ठिकाणी मोठी धुसफूस सुरू आहे. वर्षानुवर्षे वेगवेगळ्या पदांवर ठाण मांडून बसलेल्यांच्या विरोधात टीकाटिप्पणी सुरू आहे. मात्र वरिष्ठांकडून त्याची दखल घेतली जात नाही. तेच शहराध्यक्ष, तेच प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य व स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदांवरही तेच तेच नगरसेवक यामुळे गेली अनेक वर्षे पक्षाचे काम निष्ठापूर्वक करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांना बदला, नव्यांना संधी द्या, अशी मागणी पुण्यासह अनेक शहरांमधून होत आहे.
पुण्यातल्या काहींनी त्याबाबत प्रदेश शाखेला लेखी पत्र दिले होते. त्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी शर्मा यांना पाठविले. त्यांनी काँग्रेस भवन येथे पक्षाच्या आजी-माजी आमदार, नगरसेवक, तसेच प्रमुख पदाधिकाºयांची भेट घेतली. अन्य काही पदाधिकारीही वेगवेगळ्या शहरांमध्ये गेले असल्याची माहिती शर्मा यांनी दिली.
शर्मा यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की कार्यकर्ते, पदाधिकारी काम करीत असतात. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी प्रदेशाध्यक्षांची थोरातांची भावना आहे. त्यांच्याच सूचनेवरून हा संवाद साधण्यात आला. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. त्याचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्षांना देऊ. पालिकेतील गटनेतेपद व शहराध्यक्ष याबाबत सर्वांशी बोललो. काय बोलणे झाले, याचा तपशील देण्यास शर्मा यांनी नकार दिला व प्रदेशाध्यक्ष याबाबतीत सांगतील, असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागेवर बाळासाहेब थोरात यांची निवड झाली. त्यांनी पाच विभागीय कार्याध्यक्ष नियुक्त केले. विधानसभा निवडणुकीनंतर त्या पाच विभागीय कार्याध्यक्षांपैकी खुद्द प्रदेशाध्यक्ष थोरात हेच मंत्री झाले. त्याशिवाय विश्वजित कदम यांच्यासह अन्य तीनही मंत्री झाले. त्यामुळे या कार्याध्यक्षांचे पक्षाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी वाढल्या. त्याची दखल थोरात यांनी घेतल्याचे सांगितले जाते.