सावरकरांची बदनामी प्रकरण! न्यायालयात हजर राहण्यासाठी राहुल गांधींना मुदतवाढ

By नम्रता फडणीस | Published: December 2, 2024 08:00 PM2024-12-02T20:00:15+5:302024-12-02T20:00:46+5:30

न्यायालयात हजर न झाल्याने त्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढावे असा अर्ज सावरकर यांचे वकील कोल्हटकर यांनी न्यायालयात केला आहे

Savarkar defamation case! Extension of time for Rahul Gandhi to appear in court | सावरकरांची बदनामी प्रकरण! न्यायालयात हजर राहण्यासाठी राहुल गांधींना मुदतवाढ

सावरकरांची बदनामी प्रकरण! न्यायालयात हजर राहण्यासाठी राहुल गांधींना मुदतवाढ

पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या लोकसभेच्या अधिवेशनात आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयात गैरहजर राहण्याची परवानगी मिळून व्यक्तीशः उपस्थित राहण्यास मुदतवाढ मिळावी, असा अर्ज गांधी यांच्या वकिलांनी सोमवारी (दि. २) न्यायालयात केला. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना सुनावणीस हजर होण्यासाठी दि. १० जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, जोपर्यंत या दाव्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत गांधी यांनी सावरकर यांच्यावर टीका करू नये, असे त्यांना सांगावे असेही न्यायालयाने वकिलांना सूचित केले आहे.

राहुल गांधी हे विद्यमान खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. देशातील विविध निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते देशभर दौऱ्यावर होते. येथील न्यायालयाचे समन्स त्यांना मिळाले आहे. मात्र, दौऱ्यामध्ये व्यस्त असल्याने ते न्यायालयात हजर राहू शकत नाहीत, असे राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी १८ नोव्हेंबर रोजी दाखल केलेल्या अर्जात नमूद होते. त्यावर सुनावणी घेऊन सोमवारी गांधी यांना न्यायालयात हजर करावे, असा आदेश ॲड. पवार यांना देत न्यायालयाने खटला तहकूब केला होता.

दरम्यान, गांधी यांनी एका भाषणात पुन्हा सावरकर यांची बदनामी करणारे वक्तव्य केले, असे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हाटकर यांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. त्यावर न्यायालयाने ॲड. पवार यांना सूचित केले की, या दाव्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर टीका करू नये, असे त्यांना सांगावे. तसेच या प्रकरणी हजर राहण्यास मुदतवाढ देत पुढील सुनावणी १० जानेवारी २०२५ ला घेण्याचे सांगण्यात आले.

हजर झाले नाही म्हणून शिक्षा व्हावी

राहुल गांधी सोमवारी (दि. २) न्यायालयात हजर झाले नाहीत म्हणून त्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढावे, तसेच कलम १७४ तरतुदीनुसार त्यांना शिक्षा व्हावी, असा अर्ज सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयात केला आहे. यासह न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करावी, असा देखील अर्ज केला आहे.

सध्या लोकसभेचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. अनेक महत्त्वपूर्ण विधेयके संसदेत चर्चेसाठी येणार आहेत. राहुल गांधी हे एका महत्त्वाच्या पदावर असल्याने त्यांनी लोकसभेच्या अधिवेशनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे गांधी यांना न्यायालयात गैरहजर राहण्याची परवानगी मिळून न्यायालयात उपस्थित राहण्यास मुदतवाढ मिळावी, असा अर्ज न्यायालयात करण्यात आला होता. त्यानुसार हजर राहण्याबाबत मुदतवाढ मिळाली आहे. - ॲड. मिलिंद पवार, राहुल गांधी यांचे वकील

Web Title: Savarkar defamation case! Extension of time for Rahul Gandhi to appear in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.