वाट्टेल ती किंमत देऊ; पण सत्ताधाऱ्यांची अपेक्षा पूर्ण करणार नाही - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 09:48 AM2023-05-23T09:48:24+5:302023-05-23T09:49:50+5:30
‘चुकीचे काम करणाऱ्यांना संरक्षण’...
पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ ते १० नेत्यांना या ना त्या पद्धतीने त्रास देण्यात आला आहे. यामागे सत्ताधाऱ्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांकडून काही अपेक्षा असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्या अपेक्षांची पूर्तता करण्याची आम्हा लाेकांची तयारी नाही. काय असेल ती किंमत देऊ पण अपेक्षा पूर्ण करणार नाही, हे सूत्र त्यांना पसंत पडत नसल्याने या यातना सहन कराव्या लागत आहेत,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केले. बालगंधर्व रंगमंदिर येथे आयाेजित कार्यक्रमानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पवार म्हणाले, ‘जयंत पाटील यांच्यासारख्या स्वच्छ चारित्र्याचा लाैकिक असणाऱ्या व्यक्तिमत्त्वालाही त्रास दिला जाताे. सत्ताधारी या संस्थांचा गैरवापर करतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.’ महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा काेणी किती लढवायच्या याबाबत चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले. तिन्ही पक्षांच्या दाेन सदस्यांनी साेबत बसून चर्चा करावी. काही अडचण आलीच, तर मी, उद्धव ठाकरे, साेनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आम्ही मिळून मार्ग काढू. माध्यमे याबाबत विपर्यास करीत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढण्याबाबत प्रत्येकाची वेगळी मते असली, तरी त्याबाबत निर्णय झाला नसल्याचेही पवार म्हणाले.
‘चुकीचे काम करणाऱ्यांना संरक्षण’
परमबीर सिंग प्रकरणाबाबत पवार म्हणाले, ‘सिंग यांच्याविराेधात किती तक्रारी आहेत याची राज्य सरकारने माहिती काढावी. चुकीचे काम करणाऱ्यांना संरक्षण आणि चुकीचे काम करणाऱ्यांच्या सल्ल्यांनी ज्यांचा संबंध नाही, अशा लाेकांना त्रास द्यायचे आताच्या सरकारचे सूत्र दिसत आहे.’
दंगलींमागे काेण? हे तपासण्याची वेळ
‘राज्यातील दंगलींमागे कोणत्या शक्ती आणि विचारधारा आहेत, हे पाहिले, तर ज्यांच्या हातात देशाची आणि राज्याची सत्ता आहे, त्यांचा याच्यात कितपत सहभाग आहे, हे तपासण्याची गरज नक्की आली आहे,’ असे पवार म्हणाले.
‘मलिकांची भूमिका याेग्य ठरली’
‘गैरप्रकारांबाबत नवाब मलिक हे माध्यमांसमाेर बाेलले. त्याची किंमत त्यांना माेजावी लागली. मलिकांनी ज्या लाेकांबद्दल भूमिका घेतली, त्यांच्यावर सीबीआयला कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा लागला, याचा अर्थ नवाब मलिक यांची भूमिका सत्यावर आधारित असल्याचे स्पष्ट होते,’ असे पवार म्हणाले.
नाेट बंद करून काय चमत्कार हाेणार?
‘लहरी माणसाने निर्णय घ्यावेत, असे निर्णय हल्ली घेतले जात आहेत. यापूर्वी नाेटाबंदीच्या निर्णयामुळे लाेकांचे खूप नुकसान झाले. नाेटा बदलून न दिल्याने पुणे तसेच जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकांचे नुकसान झाले. नाेटाबंदी केल्याने चमत्कार घडेल, असे बाेलण्यात आले. मात्र, अनेकांना आत्महत्या कराव्या लागल्या. व्यावसायिक, उद्याेजक उद्ध्वस्त झाले. आता परत दाेन हजारांची नाेट बंद करून सरकार काेणत्या चमत्काराची अपेक्षा करीत आहे,’ असा प्रश्न उपस्थित केला.
‘सर्व विराेधकांना एकत्र आणायचे आहे’
‘पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आपण आहात का? या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, ‘मी निवडणूक लढविणार नाही. मात्र, मला सर्व विराेधकांना एकत्र आणायचे आहे. स्थिर आणि विकासाला प्राेत्साहन देणारे सरकार हवे आहे. जनतेने साथ आणि शक्ती दिली, तर त्यातून आम्ही पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवू. बंगळुरूला गेलाे हाेतो तेथे विविध पक्षांच्या विराेधी पक्षातील नेत्यांची भेट झाली. एकत्र येऊन पुढील धाेरण ठरविणार आहोत,’ असे ते म्हणाले.
राहुल गांधींची पाठराखण
राहुल गांधी यांनी काढलेली पदयात्रा आणि जनमानसातील परिणाम याचे उदाहरण कर्नाटक निवडणुकीत दिसून आले. लाेक राहुल, तसेच त्यांच्या विचारांना शक्ती देतील.