शरद पवार सगळा संभ्रम दूर करतील, विकास कामांसाठी अजित पवारांकडेही जाऊ- अमोल कोल्हे

By राजू इनामदार | Published: August 17, 2023 06:17 PM2023-08-17T18:17:52+5:302023-08-17T18:18:52+5:30

पण विकासकामांसाठी अजित पवार यांच्याकडे जाण्यात काहीही गैर वाटणार नाही...

Sharad Pawar will remove all confusion, go to Ajit Pawar for development work - Amol Kolhe | शरद पवार सगळा संभ्रम दूर करतील, विकास कामांसाठी अजित पवारांकडेही जाऊ- अमोल कोल्हे

शरद पवार सगळा संभ्रम दूर करतील, विकास कामांसाठी अजित पवारांकडेही जाऊ- अमोल कोल्हे

googlenewsNext

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही संभ्रम नाही. असलाच तर ज्येष्ठ नेते शरद पवार सगळा संभ्रम दूर करतील असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरमधील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. आपण शरद पवार यांच्याबरोबरच आहोत, पण विकासकामांसाठी अजित पवार यांच्याकडे जाण्यात काहीही गैर वाटणार नाही असे ते म्हणाले.

टिळक रस्त्यावरील एका क्लिनिकच्या उदघाटनासाठी डॉ. कोल्हे गुरूवारी दुपारी आले होते. आपण कुठे जायचे याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही असे सांगणारे आमदार चेतन तुपे हेही त्यांच्यासमवेत होते. त्यावेळी पत्रकारांबरोबर डॉ. कोल्हे यांनी संवाद साधला. शरद पवार यांची बीडला सभा सुरू आहे. तुम्ही इथे कसे, की विचार बदलला आहे असा प्रश्न विचारला असता त्यांनी हा माझा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. त्यामुळे यावे लागले असे सांगितले. विचार बदलण्याचा प्रश्नच नाही. संसदेतील भाषणात तसेच नंतरही आपण कुठे आहोत ते स्पष्ट केले आहे. त्यामुळे या विषयावर जे काही सुरू आहे ते चुकीचे आहे. कार्यकर्ते,नागरिक किंवा इंडिया आघाडीतील अन्य पक्ष यांच्यात काही संभ्रम असलाच तर तो शरद पवार नक्की दूर करतील असे ते म्हणाले.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढे शरद पवारही भाजपबरोबर असतील असे म्हटले आहे याकडे लक्ष वेधले असता कोल्हे म्हणाले, याच बावनकुळे यांना पक्षाने मागील विधानसभा निवडणुकीत उमदेवारीही दिली नव्हती. अशा व्यक्तीने राष्ट्रीय नेते असलेल्या पवार यांच्याबाबत बोलावे याचे आश्चर्य वाटते. शरद पवार इंडिया या विरोधी आघाडीबरोबर आहेत, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत इतके सगळे स्पष्ट असतानाही संभ्रम कसला असा प्रश्न कोल्हे यांनीच विचारला.

तर अजित पवारांकडेही जाऊ-

विकासकामे महत्वाची असतात. लोक त्यासाठीच निवडून देतात. माझ्यासाठी शिरूर मतदारसंघातील विकासकामांचा प्रश्न अन्य कशाहीपेक्षा महत्वाचा आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याकडे जावे लागले तरी जाईल. त्यात चूक काही नाही. खुद्द अजित पवारही विकासाकामांबाबत अडचण करणार नाही याची खात्री आहे. तू तिकडे राहिलास तर तुझी कामे होणार नाहीत असा अजित पवार यांचा स्वभाव नाही असे कोल्हे म्हणाले. काही आमदारांनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही, मात्र त्याची अन्य काही त्यांच्यापुरती गरजेची कारणे असतील, पण तेही लवकरच निर्णय घेतील असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला.

Web Title: Sharad Pawar will remove all confusion, go to Ajit Pawar for development work - Amol Kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.