... तर राजपुत्राला राजा करू नये, अमित शाहंचा राहुल गांधींना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 08:11 PM2018-07-08T20:11:03+5:302018-07-08T20:12:26+5:30
राजाला एकच मुलगा असेल आणि त्याला राज्यकारभाराची समज नसेल तर त्याला राजा न बनवण्याची कल्पना तेवीसशे वर्षांपूर्वी आर्य चाणक्यांनी मांडली होती.
पुणे : राजाला एकच मुलगा असेल आणि त्याला राज्यकारभाराची समज नसेल तर त्याला राजा न बनवण्याची कल्पना तेवीसशे वर्षांपूर्वी आर्य चाणक्यांनी मांडली होती. मात्र, राज्य कारभाराची समज नसल्यास राजपुत्राला राजा करु नये असा खोचक टोला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राहुल गांधींना लगावला. पुण्यात 12व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. यावेळी 'आर्य चाणक्य-जीवन और कार्य-आज के संदर्भ में' हा विषय शाह यांनी विशद केला.
परिवारवाद देशाचं भलं करू शकत नाही, अशी परिकल्पना चाणक्यांनी मांडली असल्याची आठवण शाह यांनी आपल्या भाषणात करून दिली. विशेषतः काँग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष राहुल गांधी यांना चपखल बसू शकते असे मत त्यांनी मांडताच उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवत त्यांच्या भाषणाला दाद दिली. विदेश व्यापारात देशहिताला प्राधान्य असावे असे चाणक्यांनी लिहिले आहे, असे सांगत चाणक्यांनी मांडलेल्या साम, दाम, दंड, भेद यावरही त्यांनी आपले मत मांडले. हजारो असत्यांना तोडून सत्य तयार करणे चाणक्यांचे मूळ सूत्र असल्याचेही ते म्हणाले.