विधानसभेच्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये होणार संघटनात्मक बदल; पक्षाचा चेहरा तरुण करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 11:15 AM2024-12-03T11:15:51+5:302024-12-03T11:19:06+5:30

राज्यात संघटनात्मक पातळीवर फार मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत

Signs of organizational change in Congress in the state Taking note of the assembly defeat Will make the party face younger | विधानसभेच्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये होणार संघटनात्मक बदल; पक्षाचा चेहरा तरुण करणार

विधानसभेच्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये होणार संघटनात्मक बदल; पक्षाचा चेहरा तरुण करणार

पुणे : विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाची काँग्रेसच्या केंद्रीय श्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली आहे. पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी याबाबतचा आपला सविस्तर अहवाल श्रेष्ठींना दिला आहे. त्यावर राज्यात संघटनात्मक पातळीवर फार मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत. तरुणांना वाव देण्याबरोबरच नवे, राजकीय पार्श्वभूमी नसलेले चेहरे देण्याबाबत खुद्द राहुल गांधी यांनीच सूचना केली असल्याचे पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. येत्या आठ दिवसांतच याबाबत बैठक होईल, अशी माहिती मिळाली.

पक्षाला राज्यात लोकसभेला अनपेक्षित यश मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचा भाव वधारला. मात्र, त्याचा फायदा उचलण्याचे सोडून राज्यातील नेते आम्हीच मोठे भाऊ, आमचाच मुख्यमंत्री होणार, अशी जाहीर वक्तव्ये करू लागले. त्यावरही चेन्नीथला यांनी आपल्या अहवालात संबंधित नेत्यांवर अपरिपक्व असा शिक्का मारला असल्याचे समजते. विधानसभेतील पराभवानंतर चेन्नीथला राज्यात एकदाही आले नाहीत. त्यांनी पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक घेण्याबाबत प्रदेश शाखेला कळवले. तशी बैठक झालीही, तर त्या बैठकीतच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अनेकांनी शरसंधान साधले व या पराभवाला तेच जबाबदार असल्याची टीका केली.

त्यावरून प्रदेश शाखेने विदर्भातील एका पराभूत आमदाराला नोटीस बजावली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना महाराष्ट्रात विजयाची अपेक्षा होती. ती दूरच राहिली; उलट दारुण पराभव झाला. त्यामुळे तेही पक्षाच्या प्रदेश संघटनेवर संतप्त झाले. त्यांनी चेन्नीथला यांना याबाबत विचारणा केली. त्यामुळेच चेन्नीथला यांनी या पराभवाच्या कारणांचा सविस्तर अहवाल त्यांच्याकडे दिला.

त्यावरून केंद्रीय स्तरावरच संघटनात्मक बदलांचा निर्णय झाला. पक्षाचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संमतीनंतर या बदलांची प्रक्रिया सुरू होणार आहे. राहुल यांनी पक्षासाठी नवे चेहरे देताना ते तरुण असतील, पक्षाबरोबर निष्ठावान असतील, फार मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेले नसतील याची काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचे सांगण्यात येते.

काँग्रेसच्या दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना राज्यस्तरावर तर बदल अपेक्षित आहेच, पण शहर व जिल्हा स्तरावरही हा बदल झिरपावा, असे त्यांचे म्हणणे आहे. मोठी शहरे व जिल्ह्यात, तालुक्यांमध्ये झालेल्या पराभवाची कारणे शोधली गेली तर संघटनेचे अस्तित्वच राहिले नसल्याने हा पराभव झाला असल्याचे लक्षात येईल. त्यामुळेच फक्त प्रदेशातच नाही तर शहरे व जिल्हा, तालुका स्तरावरही खांदेपालट केली जावी, अशी चर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आहे.

Web Title: Signs of organizational change in Congress in the state Taking note of the assembly defeat Will make the party face younger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.