पक्ष मोठा असल्याने मतभेद असणार, पण म्हणून कोणी लगेच पक्ष सोडत नाहीत - रवींद्र धंगेकर
By राजू इनामदार | Updated: February 24, 2025 19:15 IST2025-02-24T19:14:28+5:302025-02-24T19:15:01+5:30
लोकसभेपासून विधानसभा तसेच दरम्यानच्या महापालिका निवडणुकीतही पुण्यात अपयशच पाहणाऱ्या काँग्रेसमधून आता नेत्यांसह कार्यकर्तेही बाहेर पडू लागले आहेत

पक्ष मोठा असल्याने मतभेद असणार, पण म्हणून कोणी लगेच पक्ष सोडत नाहीत - रवींद्र धंगेकर
पुणे: लोकसभेत राज्यात चांगले यश मिळवणाऱ्या व नंतर विधानसभा निवडणुकीत मात्र फटका बसलेल्या काँग्रेसच्या पुण्याची अपयशाची साखळी काही तुटायला तयार नाही. लोकसभेपासून विधानसभा तसेच दरम्यानच्या महापालिका निवडणुकीतही पुण्यात अपयशच पाहणाऱ्या काँग्रेसमधून आता नेत्यांसह कार्यकर्तेही बाहेर पडू लागले आहेत. महापालिकेच्या येत्या निवडणुकीआधीच पक्षांतर करून घेण्याच्या मागे काँग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्ते दिसत आहेत.
एका माजी आमदाराच्या नावाची जोरदार चर्चा सध्या शहरात आहे. विधान परिषद किंवा म्हाडाचे अध्यक्षपद, महापालिकेच्या १५ ते २० जागा व शहराध्यक्षपद अशी मागणी या आमदाराने शिवसेना (एकनाथ शिंदे( पक्षाकडे केली असल्याचे समजते. सध्या पुण्यात शिंदेसेनेकडे फारशी राजकीय ताकद नाही. उद्धवसेनेतून ५ नगरसेवक बाहेर पडले, मात्र त्यांनी शिंदेसेनेला पसंती न देता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिंदेसेनेकडे सध्या तरी शहरात मोठा चेहरा नाही. शहराध्यक्ष असलेले माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी ‘मिशन टायगर’ राबवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळायला तयार नाही.
ही राजकीय स्थिती ओळखूनच काँग्रेसच्या त्या माजी आमदाराने, माझ्याकडे जबाबदारी द्या, मी शहरात पक्ष वाढवून दाखवतो, अशी ऑफर दिली असल्याचे समजते. शिंदेसेनेच्या मुंबईतील काही वरिष्ठांबरोबर त्यांच्या प्राथमिक बैठका झाल्या, त्यात त्यांनी शहरात तुम्हाला पक्ष वाढवायचा असेल तर भाजपबरोबर छुपी राजकीय लढाई करावी लागेल व ती मीच करू शकतो, असे सांगितले असल्याची माहिती मिळाली. माझा राजकीय फायदा पक्षाला मोठी राजकीय ताकद मिळवून देईल, असेही या माजी आमदाराने सांगितले असल्याचे कळते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याविषयीची सगळी माहिती गेली असून तेच याबाबतचा अंतिम निर्णय घेतील, असे सांगण्यात आले.
युवक काँग्रेसचे रोहन सुरवसे हेही पक्ष सोडण्याच्या भूमिकेत आले असल्याचे बोलले जात आहे. आपल्या कार्यकर्त्यांसह ते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली. पक्षातील जुने नेते नव्यांना पुढे येऊ देत नाहीत, राजकीय संधी दिली जात नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
धंगेकर पक्ष सोडणार नाहीत
सुरवसे कोण आहेत ते मला माहितीही नाही, माजी आमदार म्हणून बोलले जाते ते रवींद्र धंगेकर यांच्या संदर्भात आहे, मात्र ते काँग्रेस सोडतील याचा मला विश्वास नाही. कारण पक्षाने त्यांना अनेकांना डावलून बऱ्याच मोठ्या संधी दिल्या आहेत. दुसऱ्या पक्षात जाऊन ते स्वत:ची राजकीय विश्वासार्हता सध्याच्या काळात धोक्यात आणणार नाहीत, असा मला विश्वास आहे - अरविंद शिंदे, प्रभारी शहराध्यक्ष, काँग्रेस
मतभेद आहेत, पण पक्ष का सोडू?
माझ्या बाबतीत दुसऱ्या पक्षात जाणार वगैरे जे बोलले जाते ते निखालस खोटे आहे. माझा तसा मुळीच विचार नाही. काँग्रेस पक्ष मोठा पक्ष आहे, अनेक नेते आहेत, पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत, त्यामुळेच मतभेद असणार, आहेत. पण म्हणून कोणी लगेच पक्ष सोडत नाहीत. मीही सोडणार नाही.- रवींद्र धंगेकर, माजी आमदार, काँग्रेस