महाराष्ट्रात साहेब दोनच, एक पवारसाहेब अन् दुसरे...; कोल्हेंकडून अजित पवारांचा समाचार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 02:16 PM2024-09-13T14:16:44+5:302024-09-13T14:20:10+5:30

अजित पवार यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

There are only two Sahebs in Maharashtra amol kolhe slams Ajit Pawar | महाराष्ट्रात साहेब दोनच, एक पवारसाहेब अन् दुसरे...; कोल्हेंकडून अजित पवारांचा समाचार 

महाराष्ट्रात साहेब दोनच, एक पवारसाहेब अन् दुसरे...; कोल्हेंकडून अजित पवारांचा समाचार 

Amol Kolhe ( Marathi News ) : खेड आळंदी येथील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना मंत्रिपदाचं आश्वासन दिलं आणि आता आपणच साहेब असल्याची मिश्किल टिप्पणीही केली. अजित पवार यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. फक्त पक्षाचा अध्यक्ष झाला म्हणून कोणी साहेब होत नाही, असा टोला कोल्हे यांनी लगावला आहे.

अजित पवारांवर निशाणा साधताना अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे की, "महाराष्ट्रात साहेब दोनच आहेत. एक शरदचंद्रजी पवारसाहेब आणि दुसरे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. या दोघांनाच आमची पिढी तरी साहेब मानते. फक्त एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होणं म्हणजे साहेब होणं नाही. त्यासाठीचा सांस्कृतिक व्यासंग असेल, सामाजिक व्यासंग असेल, दुसऱ्याच्या जीवावर नव्हे तर स्वत:च्या कर्तृत्वावर उभं राहणं असेल किंवा संकट आल्यानंतर पळून न जाता संकटाला छातीवर झेलणं म्हणजे पवारसाहेब असणं आहे आणि हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने अजितदादांनी सांगण्याची गरज नाही," अशा शब्दांत कोल्हे यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.

अजित पवार नक्की काय म्हणाले होते?

तीर्थक्षेत्र आळंदीसह खेड तालुक्यात आमदार दिलीप मोहिते - पाटील यांच्या जनसंवाद दौऱ्याला अजित पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "महायुतीच्या जागा वाटपात खेड-आळंदीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली, तर पुन्हा एकदा दिलीप मोहिते पाटलांना निवडून द्या. ग्रामपंचायत ते आमदारापर्यंत गाडी पोहोचली आहे. आता दिव्यापर्यंत गाडी पोहोचवण्यासाठी साथ द्या. दिलीप मोहितेंना आमदार करा, खेड-आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो. आता आपल्याला कोणाला सांगायची गरज नाही. आता आपणच  साहेब आहोत," असं अजित पवारांनी म्हटलं होतं.

Web Title: There are only two Sahebs in Maharashtra amol kolhe slams Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.