Ajit Pawar : "पुणे शहरातील लसीकरण केंद्रात राजकीय मंडळींची अनावश्यक उपस्थिती, बॅनरबाजी खपवून घेणार नाही....."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 05:33 PM2021-05-15T17:33:06+5:302021-05-15T17:33:43+5:30
राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची पुणे शहरातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी घेतली भेट.....
पुणे : लसीकरण केंद्रात देखील निवडणुकीप्रमाणे १०० मीटर आतमध्ये राजकीय मंडळी व कार्यकर्त्यांनी थांबू नये अशी आचारसंहिता लागू करा.आणि परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. पवार यांनी कोणत्याही लसीकरण केंद्रात राजकीय मंडळींची अनावश्यक उपस्थिती, बॅनरबाजी खपवून घेणार नाही असेही स्पष्ट केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची पुणे शहरातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी भेट घेतली.या सर्व नेतेमंडळींनी शहरातील लसीकरण केंद्रात सुरू असणाऱ्या राजकीय हस्तक्षेपाबद्दल वस्तुस्थिती पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच अनेक ठिकाणी नागरिकांना नोंदणी होऊन देखील लस मिळत नाही, तासनतास रांगेत उभे राहावे लागते, राजकीय दादागिरीला बळी पडावे लागत आहे.त्याचप्रमाणे कोरोना लस स्वतःच्या मर्जीतल्या लोकांना कशा मिळतील यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
ग्रामीण भागात SOP च्या माध्यमातून शासनाने नियमावली तयार केली आहे. अशाप्रकारे पुणे शहरात राबविण्यात यावी व पुणे महानगरपालिकेचे SOP चे स्वतंत्र ऑनलाइन अँप्लिकेशन सुरू करावे असे आदेश पुणे महागरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहे. तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पुणे शहरात SOP ची अंमलबजावणी करण्यासाठी सांगितले.
या प्रसंगी आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे संजय मोरे, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, शाम देशपांडे ,प्रशांत बधे उपस्थित होते.