"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 06:53 PM2024-05-03T18:53:30+5:302024-05-03T19:21:54+5:30
पुणे, शिरूर, मावळ आणि बारामतीमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पुण्यात आज जाहीर सभा झाली...
पुणे : नरेंद्र मोदी आणि आरएसएस देशाचे संविधान संपवू पाहत आहेत. देशातील अनेक सकारात्मक बदल संविधानामुळे झाले आहे. ज्या दिवशी भाजप संविधान संपवेल त्या दिवशी तुम्ही भारत देशाला ओळखू शकणार नाही. जे संविधान बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि इतर महान लोकांनी तयार केले त्याचे आम्ही सरंक्षण करू, असं म्हणत राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला.
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी देशातील बावीस लोकांचे सोळा लाख करोड लोकांचे कर्ज माफ केले आहे. दुसरीकडे या सरकारमध्ये गरीब आणि दलित नागरिकांना संधी दिली जात नाही. देशातील ९० टक्के लोक मनरेगातून किंवा इतर साधी कामे करत आहेत. तरीही देशातील सर्व पैसा मोदी त्यांच्या मित्रांकडे केंद्रित करत आहेत. देशातील सरकार किंवा सर्व निर्णय नव्वद अधिकारी चालवत आहेत. कुणाला किती पैसे द्यायचे ते ठरवतात. कोणत्या राज्याला किती पैसे द्यायचे ते ठरवतात. तसेच देशातील मीडियाही मोंदीच्या बातम्या दाखवण्यात व्यस्त असल्याची टीका गांधी यांनी माध्यमांवर केली.
जाती आधारित जणगणना केली जाणार -
आमचे सरकार आल्यावर जाती आधारित जणगणना केली जाणार. त्या-त्या जातीच्या संख्येनुसार सर्वांना संधी दिली जाणार असल्याचे गांधी म्हणाले. पुढे ते म्हणाले, इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर देशात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली जाणार. त्याचबरोबर अग्नीवीर योजना बंद केली जाणार. जीएसटी कर बंद केला जाणार. सध्या पेपरफुटीचे प्रमाण वाढले आहे. पेपर लिक करणाऱ्यांना कडक शिक्षा दिली जाणार. सर्व पेपर सरकारी आयोगामार्फत घेतले जातील.
नरेंद्र मोदींवर टीका -
चारशे महिलांवर बलात्कार करणाऱ्या रेवन्नासाठी नरेंद्र मोदी कर्नाटकात मते मागत आहेत. ज्या व्यक्तिने एवढे अत्याचार केले त्यांच्यासाठी मोदी प्रचार करत आहेत. सध्या मोदी कधी पाकिस्तानचा मुद्दा आणत आहेत तर कधी समुद्राच्या खाली जाऊन स्टंट करतायत. ज्येष्ठ नेत्यांच्या (शरद पवार) अपमान करण्यात नरेंद्र मोदी व्यस्त आहेत. असे वागने देशाच्या पंतप्रधान पदाला शोभत नाही म्हणत राहूल गांधींनी पंतप्रधानांवर प्रहार केला.
पुणे, शिरूर, मावळ आणि बारामतीमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पुण्यात आज (३ मे) जाहीर सभा झाली. ही सभा आरटीओ शेजारील एसएसपीएमएसच्या मैदानावर सांयकाळी झाली. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी, तर पुणे, शिरूर आणि मावळ या मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे.
बारामतीत महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे, पुण्यात रवींद्र धंगेकर, शिरूरमध्ये अमोल कोल्हे, मावळमध्ये संजोग वाघेरे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. या सभेला काँग्रेसचे महासचिव रवी चेन्नी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रजनी पाटील, विश्वजित कदम, संजय जगताप, संग्राम थोपटे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
नरेंद्र मोदींकडून राहूल गांधी आणि शरद पवार लक्ष्य-
पुण्यात सोमवारी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रेसकोर्स मैदानावर पार पडली होती. त्यावेळी मोदींनी राहूल गांधीसह शरद पवारांवर टीका केली होती. काँग्रेसलाच धर्मावर आधारीत आरक्षण द्यायचे आहे, कर्नाटकमध्ये त्यांनी तेच केले अशी घणाघाती टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील प्रचारसभेत काँग्रेसलाही लक्ष्य केले होते. महाराष्ट्रातील एका नेत्याने ३५ वर्षांपूर्वी राज्य अस्थिर केले असा आरोप करत त्यांनी थेट नाव न घेता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही टीका केली होती. धर्माच्या नावावर आरक्षण देऊ देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता