कोण होणार नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती ? आघाडी बाजी मारणार की, अजित पवारांचा दरारा कायम राहणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 20:23 IST2025-02-21T19:51:11+5:302025-02-21T20:23:33+5:30
सभापती, उपसभापती निवडीत कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या प्रमुखांचे लक्ष लागले आहे.

कोण होणार नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती ? आघाडी बाजी मारणार की, अजित पवारांचा दरारा कायम राहणार ?
नीरा : पुरंदर आणि बारामती तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापूर्वी पालकमंत्री अजित पवारांचे वर्चस्व होते. आता राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे नीरा बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडीत कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या प्रमुखांचे लक्ष लागले आहे.
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया आता जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिसूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण यांच्यावतीने काढण्यात आली आहे. यानुसार येत्या मंगळवारी (दि. २५ फेब्रुवारी) सासवड येथील उपबाजारामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर व विधानसभा निवडणुकीत झालेल्या शहा काटशहाच्या राजकारणामुळे आता नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती कोण होणार ? याकडे पुरंदर आणि बारामतीतील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे संचालक मंडळ आहे. संचालक मंडळाची निवड ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार, शरद पवार एकत्र असताना झाली होती. यावेळी राष्ट्रवादीचे दहा उमेदवार निवडून आले होते, तर काँग्रेसचे आठ उमेदवार निवडून आले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कार्यकाळ वाटून घेण्यात आला होता. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील संचालक शरद जगताप यांना पहिल्यांदा सभापती करण्यात आले होते. सध्या तरी काँग्रेसचा सभापती होईल असे म्हटले जात आहे. खरी स्पर्धा आहे ती उपसभापती पदासाठी. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या महाविकास आघाडीचे प्राबल्य आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्याकडे सहा बाजार समितीचे संचालक, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे चार संचालक असल्याचे बोलले जात आहे, तर संजय जगताप यांच्याकडे आठ संचालक आहेत. विधानसभा निवडणुकीनंतरच्या राजकीय समीकरणानुसार महाविकास आघाडीकडे एकूण बारा संचालक आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे पारडे जड झाल्याचे बोलले जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी ऐनवेळी संभाजी झेंडे यांना उमेदवारी देऊन संजय जगताप यांच्या विजयामध्ये अडथळा निर्माण केली.
अजित पवार यांनी जगताप यांच्या विजयाचा मार्ग दिवे घाटाखालीच अडविला. त्यामुळे आता या सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून अजित पवार गटाला का महत्त्व द्याव? असा सवाल काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. काँग्रेसमधून अजित पवार यांच्या विरोधात नाराजी असल्याचे पाहायला मिळते आहे. जर काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर अजित पवार यांचा उपसभापतीही होऊ शकणार नाही. त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. मात्र, असे असले तरी संजय जगताप अजित पवारांशी थेट पंगा घेणार नाहीत. असेदेखील काही संचालकांकडून बोलले जात आहे.
हे आहेत सभापतिपदाचे दावेदार ?
यावेळचे सभापतिपद हे काँग्रेसकडे असणार आहे हे निश्चित आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षामधून सभापती पदासाठी संदीप फडतरे, देविदास कामथे, अशोक निगडे यांची नावे पुढे येत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बाळासाहेब शिंदे, शरयू वाबळे यांची नावे आघाडीवर आहेत. शरद पवार गटाकडूनदेखील गणेश होले यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उपसभापती पदाच्या निवडीत चुरस निर्माण झाली आहे.