रायगडमध्ये काँग्रेसला भाजपचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 06:40 AM2019-02-06T06:40:58+5:302019-02-06T06:41:08+5:30

रायगड जिल्ह्यातील मोजक्याच भागात असलेली ताकद वाढवण्यासाठी भाजपाने जोरदार प्रयत्न सुरू केले असून माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपचे कमळ हाती घेण्याचे ठरवले आहे.

Congress pushing Congress in Raigad | रायगडमध्ये काँग्रेसला भाजपचा धक्का

रायगडमध्ये काँग्रेसला भाजपचा धक्का

Next

पेण : रायगड जिल्ह्यातील मोजक्याच भागात असलेली ताकद वाढवण्यासाठी भाजपाने जोरदार प्रयत्न सुरू केले असून माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपचे कमळ हाती घेण्याचे ठरवले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरमध्ये अण्णा हजारे यांचे उपोषण सोडवण्याच्या तयारीत असल्याने ते तेथून परतताच वर्षा बंगल्यावर प्रवेशाचा सोहळा पार पडेल.

पेणमधील वैकुंठ निवास या त्यांच्या निवासस्थानातून सकाळीच शेकडो समर्थकांसह ते मुंबईला गेल्याने या राजकीय घडामोडींवर शिक्कामोर्तब झाले. पनवेलमध्ये ताकद वाढवल्यानंतर पेण विधानसभा मतदारसंघात ताकद वाढवण्याचे भाजपाचे प्रयत्न प्रत्यक्षात येतील आणि विधानसभेची गणिते बदलतील. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर या घडामोडींना वेग आल्याने ठाण्यापाठोपाठ रायगडमध्ये पाय रोवण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न फळास येण्याची चिन्हे आहेत. रविशेठ पाटील यांच्यावर जिल्हा पातळीवरील पक्षाची मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.
राष्टÑवादी काँग्रेस- शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीला कडवा राजकीय विरोध करणारे म्हणून रविशेठ यांची ओळख आहे. हा राजकीय विरोध जपतानाच ते काँग्रेस पक्षापासून दूरावत गेल्याचे गेली दोन वर्षे दिसत होते. काँग्रेस पक्षावर दबावतंत्राचे राजकारण करत, प्रदेश काँग्रेसच्या बैठकांना गैरहजर राहत त्यांनी पक्षावरील नाराजी दाखवून देणे सुरू ठेवले होते. पेणमधील काँग्रेसच्या संघर्ष यात्रेकडे पाठ फिरवत त्यांनी बंडाच्या पवित्र्यात असल्याचे दाखवून दिले. राष्टÑवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यासाठी लोकसभेत काम करूनही विधानसभेत आघाडीधर्म पाळला जात नसल्याचा आक्षेप त्यांनी यापूर्वी जाहीरपणे घेतला होता.

पेणमध्ये होणार शक्तिप्रदर्शन

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करण्याचा कार्यक्रम मुंबईत होणार असला, तरी त्यानंतर आपली ताकद दाखवून देण्यासाठी पेणमध्ये रविशेठ मोठा मेळावा घेत शक्तिप्रदर्शन करतील, अशी चर्चा आहे. त्यावेळी भाजपाचे विविध नेते उपस्थित राहतील, असे सांगितले जाते.

Web Title: Congress pushing Congress in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.