प्री-वेडिंग शूटच्या माध्यमातून पर्यटन विकास साधा; विरोध करणाऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी ओढले कान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 06:59 PM2021-06-04T18:59:57+5:302021-06-04T19:00:24+5:30
प्री-वेडिंग शूटसाठी आलेले जोडपे हनिमून साजरे करण्यासह लग्नाचा पहिला वाढदिवसही साजरा करण्यासाठी रायगडात आले पाहिजेत. यातून पर्यटन वाढीला चालना मिळेल, अजित पवार यांचं वक्तव्य
रायगड : ऐतिहासिक स्थळांवर प्री-वेडिंग शूट करण्यावरुन मध्यंतरी बराच वादंग निर्माण झाला होतात. मात्र प्री-वेडिंग शूटच्या माध्यमातून पर्यटन स्थळांचा विकास साधण्याबाबत प्रशासनाने विचार करावा, अशी सूचना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्री-वेडिंग शूटला विरोध करणाऱ्यांचे कान ओढले आहेत. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदार संघातील तब्बल २३ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपजन पवार यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोललत होते.
"सध्या प्री-वेडिंग शूटचा ट्रेंड आहे. लग्नाआधीच्या आठवणींसाठी विवाह बंधनात अडकणारे जोडपे असे चित्रिकरण करतात. प्री-वेडिंग शूटचा व्यवसाय आहे. त्यामुळे गड-किल्ले यावर प्री-वेडिंगचे शूटींग करताना त्यांना अडवू नका. प्री-वेडिंग शूटच्या माध्यमातून पर्यटन विकास कसा साधता येईल याचा विचार करा. त्याबाबत आवश्यक ती नियमावली जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांनी एकत्रित तयार करावी. तसेच त्यासाठी काही शुल्कही आकारावे. प्री-वेडिंग शूटकडे उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून पाहा," असा सल्ला पवार यांनी दिला.
पवार यांच्या या सल्ल्यामुळे नजिकच्या कालावधीत समुद्रकिनारी, पर्यटन स्थळी प्री-वेडिंग शूट करणाऱ्या जोडप्यांना आणि शूटींग करणाऱ्यांना आता कोणतीही अडचण येणार नसल्याचे दिसून येते आहे .अनेकवेळा प्री-वेडिंग शूटिंगसाठी नियमावली नसल्याने भांडणाचे प्रसंग निर्माण होत असतात. त्यामुळे पोलिसापर्यंत हा विषय जातो आणि आर्थिक भुर्दंड पडतो. मात्र, त्यांना रितसर परवानगी दिल्यास हे वाद टाळले जातील असेही पवार यावेळी स्पष्ट केले. प्री-वेडिंग शूटला अभय द्या, प्री-वेडिंग शूट करणाऱ्या जोडप्याना अभय द्या, प्री-वेडिंग शूटसाठी आलेले जोडपे हनिमून साजरे करण्यासह लग्नाचा पहिला वाढदिवसही साजरा करण्यासाठी रायगडात आले पाहिजेत. यातून पर्यटन वाढीलाही चालना मिळेल," असेही पवार यांनी स्पष्ट केले.